Marathi Classical Language : मराठी भाषेला अभिजात दर्जा, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणतात....




ब्युरो टीम : मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही याबाबत एक पोस्ट एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी… अभिमान मराठी… स्वाभिमान मराठी… अभिजात मराठी…’

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे म्हंटले आहे की, समस्त मराठी जनांना अभिमान वाटावा, असा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे! या निर्णयाबद्दल तमाम मराठी जनांकडून मोदी सरकारचे मनापासून धन्यवाद आणि समस्त महाराष्ट्राचे मनःपूर्वक अभिनंदन!


मायबोली मराठीला ‘अभिजात भाषा’ म्हणून दर्जा मिळावा, यासाठी गेली अनेक दशके विविध पातळ्यांवर लढा सुरू होता. या लढ्याला मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामुळे मोठे यश आले आहे. विशेष म्हणजे नवरात्रीच्या मंगलमयी महापर्वाच्या पहिल्याच दिवशी हा बहुमान माय मराठीला मिळणं, ही सर्वांनाच अधिक आनंद देणारी बाब आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी अनेकांनी पाठपुरावा केला, विविध पातळ्यांवर संशोधन केलं. मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेकांनी मोठे योगदान दिले, त्या सर्वांच्या योगदानाला त्रिवार वंदन! तसेच तत्कालिन मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि आताच्या महायुती सरकारने यासाठी वेळोवेळी केलेला पाठपुरावा मैलाचा दगड ठरला. मला विश्वास आहे, की मराठी भाषेच्या विकासासाठी मोदी सरकार केवळ अभिजात भाषेचा दर्जा देऊनच थांबणार नाही, तर मराठीच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी आणि व्यवहारातील वापर वाढविण्यासाठी भरभरून अनुदानही देईल. पुनःश्च समस्त मराठी जनांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि मोदी सरकारचे खूप-खूप धन्यवाद, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने