ब्युरो टीम: पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीपच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मतदार जागृती करावी; विशेषत: शहरी मतदार संघात मतदान टक्केवारीत मोठी वाढ होण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान जागृतीवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वीप आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त महेश पाटील, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उपायुक्त (करमणूक शुल्क) निलीमा धायगुडे, स्वीप व्यवस्थापन उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित उपस्थित होते.
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्याने मतदार नोंदणी, मतदान टक्केवारी वाढीसाठी चांगली कामगिरी बजावल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, मतदान जागृतीवर चांगल्या प्रकारे काम झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी शहरी मतदार संघातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली होती. या कामात सातत्य ठेऊन आगामी निवडणुकीत अधिक मतदान व्हावे यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात सर्व मतदार संघात मतदार नोंदणी अधिकारी स्तरावर स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध माध्यमातून जनजागृती केल्यामुळे मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद लाभला असून जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 86 लाख 47 हजारावर पोहोचली झाली आहे. पुणे जिल्हा हा राज्यात सर्वाधिक मतदारसंख्या असलेला जिल्हा ठरला आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच याहीवेळी मोठ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्याचबरोबर मतदान केंद्रांची पुर्नरचना करताना, नवीन मतदान केंद्रे स्थापन करताना एका मतदान केंद्रावर बाराशेच्या दरम्यान मतदार संख्या असेल याची दक्षता घेण्यात आली आहे. जेणेकरुन मतदान केंद्रावर रांगा लागू नयेत. याशिवाय मतदारांची नावे जवळच्या मतदान केंद्रावर समाविष्ट करणे, एकाच कुटुंबातील मतदारांची नावे एकाच मतदान केंद्रावर येतील यादृष्टीने काळजी घेण्यात आली आहे.
नामनिर्देशन दाखल करण्यास सुरूवात झाल्यानंतर 10 दिवसांपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. त्याची माहिती गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सभासदांना द्यावी आणि ते अर्ज क्र. 6 भरतील यादृष्टीने प्रयत्न करावेत. संस्थेत नव्याने स्थलांतरीत झालेले भाडेकरू, नव्याने विवाह होऊन आलेल्या विवाहिता आदींसह कोणीही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.
मतदारांना आपल्या मतदान केंद्रांची माहिती व्हावी यासाठी ‘नो युवर पोलींग स्टेशन’ हा उपक्रम लोकसभा निवडणुकीवेळी राबविला होता. या उपक्रमाची यावेळी प्रत्येक मतदान केंद्र स्तरावर, गृह निर्माण संस्था स्तरावर तसेच अन्य ठिकाणी जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यात यावी. गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सदस्यांना त्यांचे मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी मदत करावी, त्यांचे मतदान केंद्राची माहिती त्यांना द्यावी. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, शहरातील सहकारी संस्थांचे सर्व उपनिबंधक तसेच त्यांच्याअंतर्गत अधिकारी, कर्मचारी, पॅनेलवरील लेखापरीक्षक यांनी याकामी गृहनिर्माण संस्थांसोबत समन्वयाने काम करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदार संघांत मतदान वाढीसाठी विविध उपक्रम हाती घ्यावेत. त्यासाठी गटविकास अधिकारी आणि त्यांच्याअंतर्गत पंचायत समित्यांची यंत्रणा तसेच विविध विभागांच्या समन्वयाने मतदार जागृती करावी. सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांचे मतदानाचे संकल्पपत्र भरुन घ्यावे.
लोकसभा निवडणुकीवेळी 80 वर्षावरील ज्येष्ठ मतदारांसाठी राबविलेल्या ‘आजी आजोबा चला मतदानाला…!’ या नाविन्यपूर्ण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ही मोहिम अधिक चांगल्या प्रकारे राबवायची असून गृहनिर्माण संस्थांनी आपल्या संस्थातील वृद्ध मतदारांची माहिती दिल्यास त्याप्रमाणे व्हीलचेअरची व्यवस्था करता येईल. यावेळी वृद्धाश्रमातही मतदान केंद्रे स्थापन करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
औद्योगिक आस्थापनांसोबत बैठक घेऊन त्यांच्या कामगारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याबाबत आवाहन करण्यात येईल. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी महिला स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून मतदार जनजागृतीत आपली भूमिका बजावावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी मतदार नोंदणी अधिकारी, विधानसभा मतदार संघांचे स्वीप नोडल अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा