Pune : मंत्री मोहोळ यांचे खासदार जनसंपर्क सेवा अभियान


ब्युरो टीम :  एकीकडे कोणाची वैयक्तिक समस्या तर कोणाची सार्वजनिक नागरी समस्या, दुसरीकडे काहींच्या विधायक सूचना तर कोणाच्या शहराच्या विकासाबाबत अभिनव कल्पना ! हे चित्र पाहायला मिळाले केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियाना’त ! खासदार म्हणून थेट नागरिकांचे प्रश्न समजून घेता यावेत आणि ते सोडवता यावेत यासाठी मोहोळ यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. त्याचा दुसरा टप्पा कसबा विधानसभा मतदारसंघात पार पडला.

नागरीकांनी केवळ त्यांच्या तकारी प्रश्नांचा पाढा न वाचता मतदारसंघातील विविध समस्यांसह वाहतुकीच्या समस्येसारख्या जिव्हाळ्याच्या काही विषयात विधायक सूचनाही केल्याने या अभियानात वेळगळेच चित्र बघायला मिळाले. यावेळी शेकडो नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवला. यावेळी महापालिका आणि शासनाच्या विविध विभागासह पोलिस खात्याचाही स्टॉल लावत अधिकारी उपस्थित होते. हा उपक्रम विधानसभानिहाय प्रत्येक महिन्याला राबविला जाणार आहे.

यासंदर्भात माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष, नंतर शहराचा महापौर असतानाही अशा अभियानव्दारे नागरीकांशी थेट संवाद साधण्याचा उपक्रम केलेला होता. त्याला पुणेकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आताही केंद्रीय राज्यमंत्रीपदाची जबाबदारी असली तरी पुण्याचा खासदार या नात्याने थेट नागरिकांना भेटून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न सातत्याने सुरु राहील’

‘वैयक्तिक समस्या घेऊन जसे नागरीक अभियानात सहभागी झाले, तसे सार्वजनिक हिताचे प्रश्न आणि त्यावरील उपाययोजनांच्या सूचना घेऊन नागरीक आले होते. तसेच काहीजण विकासाबद्दलच्या नवीन संकल्पना घेऊन आले होते. या सर्वांना लोकप्रतिनिधीबद्दल असलेला विश्वास यातून अधोरेखीत होत होता. काही नागरिकांच्या समस्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होत्या, मात्र, या अभियानाव्दारे त्यांचा काही तासातच निपटारा झाल्याबद्दल नागरीकांनी आवर्जून भेटून धन्यवादही दिल्याने काम करण्याचा उत्साह वाढला’, असेही मोहोळ म्हणाले.

‘काही प्रश्न हे ठराविक कालावधीतच सुटले पाहिजेत, अशी लोकप्रतिनीधी म्हणून आपली भूमिका आहे. त्या दिशेने पाठपुरावाही करण्यात येत आहे. केवळ तक्रारी किंवा प्रश्न सोडवणे इतका मर्यादित हेतू या अभियानाचा नाही. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोचवणे, गरजूंना योजनांचा लाभ मिळवून देणे या हेतूने शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉलही लावण्यात आले होते’ असेही मोहोळ म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने