Pune : आज कोथरूडमध्ये महा कन्यापूजन, पाच हजार पेक्षा जास्त मुलींचे होणार पूजन



ब्युरो टीम : नवरात्रोत्सव काळात कन्यापूजनाचे वेगळे महत्त्व असून, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुडमध्ये महा कन्या पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या अद्भूत सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात पाटील यांनी केले आहे. 

धार्मिक श्रद्धांनुसार,नवरात्रोत्सव काळातील नवमी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दुर्गा देवीच्या नऊ रूपांची मुलींच्या रूपात पूजा केली जाते. या उपासनेने दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि भक्तांच्या जीवनात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. यासोबतच कन्यापूजना शिवाय नवरात्रीची उपासना यशस्वी होऊ शकत नाही, अशी देखील धारणा आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आणि उत्सवाच्या निमित्ताने उपासनेचे फळ सर्वांना लाभावे, यासाठी  चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मध्ये महा कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पाटील हे देखील सात मुलींचे पूजन करणार आहेत. मंत्रोच्चाराच्या घोषात, आध्यात्मिक वातावरणात ११ ऑक्टोबर रोजी कोथरुड मधील शुभारंभ लॉन्स येथे सायंकाळी ४.३० ते ७ वेळेत हा नयनरम्य सोहळा संपन्न होणार आहे. 

शक्ती, बुद्धी आणि धनधान्य देणार्‍या मातांची रूपे वेगवेगळी आहेत. लहान मुलींमध्ये ही रूपे दिसतात. कन्या हे देवीचे स्वरूप असते. तिच्या जन्माने प्रत्येक कुटुंबात सुख, समृद्धी आणि भरभराट होते. नवरात्रोत्सव काळात तिची पूजा म्हणजे साक्षात, आदिमायेची पूजा करणे आहे. मागील पाच वर्षांत कोथरुड मधील मुलींचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून हजारो मुलींचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यासोबतच मानसी सारख्या उपक्रमातून वस्ती भागातील मुलींच्या व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोथरूड मध्ये आयोजित महा कन्यापूजन सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री पाटील यांनी यावेळी केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने