ब्युरो टीम : मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यातील छायाचित्रकारांसाठी ‘डेमोक्रसी स्टुडिओ’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील छायाचित्रकारांनी लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवर आधारित छायाचित्र पाठविण्याचे आवाहन अहिल्यानगर जिल्हा स्वीप समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
व्यावसायिक, वृत्तपत्र छायाचित्रकार, हौशी, शालेय गट(पाचवी ते बारावी - मोबाईल फोटोग्राफी) व खुला गट (मोबाईल फोटोग्राफी) अशा पाच गटात ही स्पर्धा होणार असून लोकशाही, मतदान , निवडणूक प्रक्रिया , मतदार जनजागृती, बोटावरील लोकशाहीची शाई हे स्पर्धेचे विषय आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपले फोटो इमेज/ पीडीएफ / डॉक्युमेंट अशा कुठल्याही स्वरूपात स्वतःच्या नाव , नंबर , पत्ता , गट तसेच फोटो स्वतःच काढलेला आहे अशा प्रतिज्ञापत्रासह अहिल्यानगर स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक - ९००२ १० ९००३ वर १७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पाठवायचे आहेत. एका स्पर्धकास एकापेक्षा अधिक छायाचित्रे पाठवता येतील तसेच परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र वितरित केली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होतांना आचारसंहिता आणि निवडणूक विषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
भित्तीपत्रकाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते मतदार जागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या "मतदानाची दृष्टी...फुलवी लोकशाहीची सृष्टी" हे घोषवाक्य असलेल्या स्पर्धेच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी अशोक कडूस, जिल्हा मतदारदूत डॉ.अमोल बागुल आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा