ब्युरो टीम : अहिल्यानगर विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, सर्व मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणजेच मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी महानगरपालिकेमार्फत जनजागृती केली जात आहे. मतदार हा लोकशाहीचा अंगरक्षक असतो. वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाने मतदार नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. अठरावं वरीस धोक्याचं.. असं म्हटलं जातं. मात्र, अठरावं वरीस धोक्याचं नव्हे तर मोक्याचंच आहे. लोकशाही अधिक बळकट करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत अहिल्यानगर मधील सर्व मतदारांनी मतदान करून लोकशाहीचे अंगरक्षक बनावे, असे आवाहन अहिल्यानगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १०० टक्के मतदानाचा संकल्प करत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. स्वीप कार्यक्रमांतर्गत अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमही राबविण्यात येत आहेत. आता महानगरपालिकेच्या वतीने मतदार जागृतीसाठी जनजागृतीचे फलक असलेला रथ तयार केला आहे. त्याचे अनावरण मंगळवारी करण्यात आले. या रथाच्या माध्यमातून संपूर्ण शहरात मतदारांमध्ये जागृती केली जाणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयांसह शहराच्या विविध भागात होर्डिंग लावून मतदारांना शंभर टक्के मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या वतीने सेल्फी स्टॅन्डही तयार करण्यात आले आहेत.
शहरातील विविध घटकातील नागरिक दिव्यांग बांधव तृतीयपंथी आदींमध्ये जनजागृती करून शंभर टक्के मतदानाचा संकल्प करणारी शपथ सर्वांना दिली जात आहे. महानगरपालिकेच्या बस सेवा देणाऱ्या बसेस, बस स्टॉप, कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या आदींवर फलक लावून, जिंगल्स वाजवून मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. मतदारांकडून संकल्पपत्र भरून घेतले जात आहेत महापालिकेतील देयके, विविध पावत्यांवर वॉटरमार्क द्वारे मतदार जागृतीचा लोगो छापण्यात आला आहे. सोशल मीडियात अधिकाऱ्यांमार्फत मतदारांना मतदानासाठी आवाहन केले जात आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम, कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. विविध मॉर्निंग ग्रुप मध्ये चर्चासत्र घडवून आणत वेगळ्या प्रकारे जनजागृती केली जात असल्याचे यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा