ब्युरो टीम : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी आता सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारात उतरले आहेत. त्यातच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी जाहीर सभेत बोलताना महाराष्ट्रातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत जी वक्तव्य केली, त्यावरून महाराष्ट्र राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आज,शुक्रवारी (८ नोव्हेंबर २०२४) अमित शाह यांची शिराळा येथे सभा झाली. यावेळी 'मी लोकसभेलाही संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो. जनतेची एकच भावना आहे की, आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना विजयी करायचे आहे,'असे विधान अमित शाह यांनी करून एकप्रकारे फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.
तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही धुळे येथे जाहीर सभेत बोलताना, 'माझे मित्र देवेंद्र फडणवीस! असा सुरवातीला उल्लेख करीत आपल्या भाषणात फडणवीस यांचे कौतुक केले. भाषणात पुन्हा पुन्हा नाव घेत वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
एकंदरीत, आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ज्या पद्धतीने प्रमोट केले, त्यावरून राज्यात फडणवीस हेच भाजपचा चेहरा असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा