ब्युरो टीम : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयान्तर्गत सीबीसी म्हणजेच केंद्रीय संप्रेषण संस्थेने इफ्फी 2024 च्या निमित्ताने, इफ्फिएस्टा अंतर्गत, 'सफरनामा' नावाचे मल्टीमीडिया म्हणजे बहुमाध्यमांकित प्रदर्शन भरवले आहे. त्याखेरीज गोव्यात पणजी येथील कला अकादमीमधील गीत आणि नाट्य विभागातील कलाकारांच्या मदतीने भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वैविध्याचे दर्शनही घडवत आहे.
इफ्फीत सुरवातीला केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि प्रख्यात चित्रपट अभिनेते आणि निर्माते अक्किनेनी नागार्जुन राव यांच्या हस्ते इफ्फी 2024 मध्ये 'सफरनामा- इवोल्युशन ऑफ इंडियन सिनेमा (भारतीय चित्रपटांची उत्क्रांती)' या बहुमाध्यमांकित प्रदर्शनाचे उद्घाटन केले होते.
सीबीसी चे सफरनामा प्रदर्शन - 55 व्या इफ्फीमधील उच्च कोटीचा सांस्कृतिक अनुभव
भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार राज कपूर, मोहम्मद रफी, तपन सिन्हा आणि अक्किनेनी नागेश्वर राव यांची शताब्दी साजरी करण्याच्या निमित्ताने, इफ्फी त्यांना आदरांजली अर्पण करत आहे. यामध्ये तीन हजार चौरस फूट क्षेत्रफळावर बहुविध प्रकारचा अनुभव देणारे प्रदर्शन भरवून सीबीसी ही कामगिरी पार पाडत आहे. यात प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांस चित्रसृष्टीत रममाण करणारी अनुभूती देण्यासाठी आभासी वास्तव तंत्रज्ञानाचाही उपयोग केला जात आहे. भारतीय सिनेसृष्टीची संपन्न परंपरा आणि इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने बहुमाध्यमांकित प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
त्याचबरोबर देशाच्या निरनिराळ्या भागातून आलेल्या मनोवेधक अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची, लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्यांची पर्वणी इफ्फिएस्टामुळे मिळत आहे. यातून देशाच्या चैतन्यमयी परंपरा आणि कलात्मक वारसाच जणू साजरा होत आहे. प्रत्येक नृत्यप्रकारात एक अभिनव कथा दडलेली असते, शिवाय स्थानिक रीतीरिवाज आणि त्या प्रदेशातील आध्यात्मिकता यांचा मूर्तिमंत संगम त्यातून दिसतो. त्यामुळे इफ्फीसाठी दाखल झालेल्या सिनेचाहत्यांना त्यातून नेत्रसुखद असा कलात्मक अनुभव मिळतो.
देशाभरातून 110 पेक्षा अधिक प्रतिभावंत कलाकार या कार्यक्रमात भाग घेत आहेत आणि त्यातून प्रादेशिक नृत्यप्रकारांचे व्यापक दर्शन घडत आहे.
सीबीसीच्या गुवाहाटी, हैदराबाद, भुवनेश्वर, जम्मू, चेन्नई, हिमाचल प्रदेश, बंगळुरू, पुणे आणि दिल्ली अशा निरनिराळ्या प्रादेशिक कार्यालयांमार्फत हे कार्यक्रम आयोजित होत आहेत.
पुढील विशेष कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे-:
आसामची सत्रीय, भोरताल, देवधानी आणि बिहू नृत्ये- सीबीसी गुवाहाटी कडून सादर
तेलंगणाचे गुस्साडी नृत्य- सीबीसी हैदराबाद कडून सादर
ओदिशाचे ओडिसी नृत्य- सीबीसी भुवनेश्वर कडून सादर
काश्मीरचे रौफ- सीबीसी जम्मू प्रदेशाकडून सादर
तमिळनाडूचे कराकट्टम- सीबीसी चेन्नई कडून सादर
केरळाचे मोहिनीअट्टम- सीबीसी केरळाकडून सादर
हिमाचल प्रदेशची शिरमोर नाटी, दग्याली आणि दीपनृत्य - सीबीसी हिमाचल कडून सादर
कर्नाटकाचे जोगती आणि दीपम नृत्य- सीबीसी बेंगळुरूकडून सादर
महाराष्ट्राची लावणी आणि मुजरा- सीबीसी पुणे कडून सादर
राजस्थानचे चेरी आणि कलबेलिया नृत्य आणि बिहारचे झिझिया नृत्य- सीबीसी दिल्लीकडून सादर
इफ्फिएस्टा काय आहे:
55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हणजे इफ्फीमध्ये इफ्फिएस्टाचा प्रारंभ करण्यात आला. गोव्यात पणजी मधील नयनरम्य अशा कला अकादमी मध्ये 21 ते 28 नोव्हेंबर दरम्यान इफ्फिएस्टामधून नेत्रसुखद मनोरंजनाची पर्वणी मिळत आहे. यामध्ये, चित्रपट, संगीत, कला आणि खाद्यपदार्थ या सर्वांची जादू आणि त्यांचा आनंद अनुभवता यावा यासाठी इफ्फीने संस्कृती आणि मनोरंजनाचा अद्भुत मेळ घालून विविध समाजांना एकत्र आणले आहे.
कला अकदमीच्या मनोरंजन परिदृश्याचा भर युवकांवर आहे. 'भारतीय चित्रपटांचा प्रवास' या मध्यवर्ती संकल्पनेभोवती 22 नोव्हेंबरला एका उत्सवी संचलनाचे आयोजनही इफ्फिएस्टा अंतर्गत करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा