IFFIWood :गोव्यात 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'पिलर्स ऑफ प्रोग्रेस : द एपिक स्टोरी ऑफ दिल्ली मेट्रो' या माहितीपटाचा प्रीमियर



ब्युरो टीम : गोव्यात  55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'पिलर्स ऑफ प्रोग्रेस : द एपिक स्टोरी ऑफ दिल्ली मेट्रो' या माहितीपटाचा प्रीमियर झाला. या माहितीपटाचे  दिग्दर्शन सतीश पांडे यांनी केले आहे, तर अनुज दयाळ हे या माहितीपटाचे निर्माते आहेत. या माहितीपटात दिल्ली मेट्रोची आजवरची प्रेरणादायी वाटचाल आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या (एनसीआर) शहरी वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवून आणण्यात दिल्ली मेट्रोने बजावलेली महत्त्वाची भूमिका मांडली आहे. 

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माहितीपटाचा ट्रेलर दाखवला गेला. या ट्रेलरमध्ये सुरुवातीच्या नियोजनाच्या टप्प्यांपासून ते जगातील सर्वात मोठी नागरी वाहतूक व्यवस्था बनण्यापर्यंतच्या दिल्ली मेट्रो रेल्वेच्या क्रांतीकारी वाटचालीची झलक दाखवली गेली आहे. विनाचालक मेट्रो रेल्वे गाडी सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी, पर्यावरणीय फायद्याच्या अनुषंगाने अंतर्भूत केलेले घटक, आणि दिल्लीसारख्या ऐतिहासिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या शहरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सेवा सुविधांचे जाळे उभारण्याच्या प्रक्रियेतली कार्यान्वयाशी संबंधित  आव्हाने हे आणि असे अनेक महत्त्वाचे मुद्दे ठळकपणे मांडले आहेत.

या माहितीपटाचे दिग्दर्शक सतीश पांडे हे गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळापासून दिल्ली मेट्रोच्या प्रगतीचे दस्तावेजीकरण करत आहेत. या माहितीपटाच्या निर्मितीच्या उद्देशाबद्दलची रंजक माहिती त्यांनी उपस्थितांना सांगितली. हा माहितीपट म्हणजे गेल्या 35 वर्षांमधील दिल्ली मेट्रो रेल्वेच्या परिवर्तनशील वाटचालीचा ऐतिहासिक दस्तऐवज असल्याची भानवा त्यांनी बोलून दाखवली. या माहितीपटात दिल्ली मेट्रो रेल्वेसमोरची आव्हाने, या प्रकल्पामधला नवोन्मेष, आणि या प्रकल्पाचा लाखो लोकांच्या जगण्यावर प्रत्यक्षात झालेला लक्षणीय परिणाम या माहितीपटात चित्रित केला असल्याचे त्यांनी सांगितले.

या माहितीपटाचे निर्माते अनुज दयाळ यांनी देखील या माहितीपटाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. दिल्ली मेट्रो रेल्वे ही स्वतंत्र भारतातली नागरी विकासाच्या दृष्टीने हाती घेतलेल्या गेलेल्या उपक्रमांपैकी एका सर्वात मोठ्या उपक्रमाचे प्रतिनिधित्व करणारी मेट्रो रेल्वे सेवा असल्याचे म्हणत, त्यांनी या प्रकल्पाचे महत्व अधोरेखित केले.  सुरुवातीला या प्रकल्पाबाबत असंख्य शंका उपस्थित केल्या गेल्या होता, प्रकल्पासमोर असंख्य आव्हाने आली, मात्र तरी देखील भारताने त्या सर्वांवर मात करत यशस्वीरित्या जागतिक दर्जाचे मेट्रो रेल्वे जाळे उभे करून दाखवले. आजच्या घडीला दिल्ली मेट्रो रेल्वेचा विस्तार 400 किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे, दररोज 17 लाखांपेक्षा जास्त प्रवासी या मेट्रो रेल्वे सेवेचा लाभ घेतात, आणि त्यांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत असलेल्या वाहतूकीची सुविधा या प्रकल्पाने उपलब्ध करून दिली आहे असे त्यांनी सांगितले. या माहितीपटाच्या माध्यमातून या सगळ्या यशाच्या कर्तृत्वाचा गौरव केला गेला आहे आणि त्याचवेळी आणि समृद्धीच्या दिशेने झालेल्या वाटचालीच्या प्रवासाची आठवण जपली आहे अशी भावना अनुज दयाळ यांनी व्यक्त केली.

या माहितीपटाच्या प्रिमिअर निमित्ताने आयोजित चर्चासत्रावेळी माहितीपटाचे निर्माते अनुज दयाळ यांनी दिल्ली मेट्रो रेल्वे उभारणीच्या प्रक्रियेतील टप्प्यांविषयी देखील माहिती दिली. दिल्ली मेट्रो रेल्वेच्या उभारणीत प्रगत पायाभूत सुविधांसोबतच प्राचीन आणि दाट लोकवस्तीच्या शहराचे एकात्मिकरण कशा रितीने घडवून आणले गेले, या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी उपयोगात आणली गेलेली नवोन्मेषता आणि या प्रकल्पाच्या शाश्वततेचे जगभराने कशा रितीने दखल घेतली या बाबीही अनुज दयाळ यांनी अधोरेखित केल्या. भारतातील पहिली मेट्रो रेल्वे व्यवस्था असलेल्या कोलकाता मेट्रोच्या उभारणी प्रक्रियेतून मिळालेल्या शिकवणीने दिल्ली मेट्रो रेल्वेच्या यशाला आकार देण्यात कशा रितीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे याबाबतही त्यांनी सांगितले.

यावेळी माहितीपटाचे दिग्दर्शक सतीश पांडे यांनी माहितीपटांच्या पलीकडे जाऊन सिनेमॅटिक पद्धतीने कथात्मक मांडणी करण्यासाठी बंधनांत न अडकता प्रयोगशीलता दाखवण्यासाठी आपण तयार असल्याचे सांगितले. या माहितीपटात खऱ्या आयुष्यातील यशाचे मैलाचे दगड दाखवले गेले.. मात्र असे असले तरी देखील दिल्ली मेट्रो रेल्वेपासून प्रेरणा घेत, सर्जनशील कथनकावर आधारलेला पूर्ण लांबीचा कथात्मक चित्रपट साकारण्यासाठीही आपण सज्ज असल्याचे सतीष पांडे यावेळी म्हणाले. असा चित्रपट प्रकल्प साकारण्यासाठी सुरेख कथानक आणि सर्जनशीलतेचा नवा ताजा दृष्टिकोन बाळगणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

सध्या दिल्ली रेल्वे मेट्रो प्रकल्पाच्या चौथ्या टप्पाचे काम प्रगतीपथावर आहे, या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रो रेल्वे सेवाचा सातत्याने होत असलेला विस्तार आणि त्याचा प्रभाव दर्शवणारा आणखी एक माहितीपट साकारणार असल्याचेही संकेतही दिग्दर्शक सतिश पांडे यांनी आपल्या बोलण्यातून दिले. चित्रपट निर्मिती क्षेत्रातल्या या दोन्ही व्यक्तिमत्वांनी आपल्या संवादातून दिल्ली मेट्रो रेल्वेच्या प्रगतीमय वाटचालीचे दस्तावेजीकरण करण्यासाठी आणि ही वेधक कथा मांडण्यासाठी नवे प्रयोगशील मार्ग चाचपडून पाहण्याबद्दलच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चारही केला.



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने