IFFIWood :महिलांना त्यांच्या अधिकारासाठी लढण्याची प्रेरणा मिळेल, तामिळ लघुपट '‘सिवंथा मान’ चे दिग्दर्शक इन्‍फॅन्‍ट यांना आशा



ब्युरो टीम : भारतीय चित्रपटांच्या विविधतेचे खरे प्रतिबिंब आज 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी ) दिसून आले.  तामिळ नॉन-फीचर फिल्म, एक हिंदी माहितीपट आणि कन्नड चित्रपटांचे दिग्दर्शक  पत्रकार परिषदेसाठी एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. भारतीय पॅनोरमा अंतर्गत  - तामिळ भाषेतील नॉन-फीचर 'सिवंथा मान’, हिंदी माहितीपट 'मैं निदा'  आणि कन्नड चित्रपट केरेबेटे, आज महोत्सवात  दाखवण्यात आले.  प्रेक्षकांनी त्यांचे खूप कौतुक केले. 

तामिळ भाषेतील हा लघुपट तामिळनाडूच्या  दक्षिणेकडील प्रांतात  घडलेल्या सत्यघटनेवर आधारित आहे. कृषी परंपरा हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या एका गावातल्या, रंजीतम नावाच्या एका गरीब आईची ही गोष्ट. ही महिला इतर दोन महिलांसोबत शेतमजूर म्हणून काम करते आणि आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी निधीसाठी संघर्ष करत आहे.  रंजीतम सहकारी सेवूथी हिची मजुरी पर्यवेक्षक वैयक्तिक रागातून  प्रदीर्घकाळ प्रलंबित ठेवतो, पैसे देण्यास सातत्याने टाळाटाळ करतो. आपल्या देशात अजूनही टिकून असलेली सरंजामशाहीची मानसिकता हा चित्रपट समोर आणतो. 

या चित्रपटाविषयी वार्ताहर परिषदेत बोलताना दिग्दर्शक इन्‍फॅन्‍ट यांनी महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले. ''समाज अजूनही महिलांचा आवाज दाबू इच्छितो'', असे निरीक्षण त्यांनी व्यक्त केले. या चित्रपटातील नायिका रंजीतम महिलांना त्यांच्या अधिकारांसाठी लढण्याची प्रेरणा देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. चलचित्रकार ईश्वरन कार्तिकेयन आणि चित्रपटाच्या चमूतील इतर सदस्य यावेळी उपस्थित होते. 

मै निदा 

कवी, तत्वज्ञानी आणि मानवतावादी निदा फाजली यांच्या निखालस प्रतिभासंपन्नतेने प्रेरित है निंदा हा चित्रपट बनवणारे दिग्दर्शक अतुल पांडे यांनी यावेळी संवाद साधला. पाच पाच भाषा जाणणारे निदा फाजली लिहिताना अत्यंत साध्या भाषेत लिहित. मात्र या प्रतिभावंताला  त्यांच्या हयातीत चित्रपट उद्योगाकडून कधीच योग्य तो सन्मान दिला गेला नाही, अशी खंत पांडे यांनी व्यक्त केली. यातूनच आधुनिक भारताला, जगाला दृकश्राव्य चरित्राच्या माध्यमातून कवी निदा फाजली यांची गोष्ट सांगण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ''आपल्या मनोरंजन उद्योगाच्या व्यवस्थेत काही ठराविक प्रकारचे कवी, कविता, कलाकार यांना पुढे आणले जाते. बाकीचे परिघाबाहेर राहतात,'' अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

निर्माते अतुल गंगवार यावेळी उपस्थित होते. निदा फाजली यांच्याशी दोन दशकांहून अधिक काळ संबंधित असलेल्या गंगवार यांच्याकडे या प्रतिभावंताशी संबंधित क्षणांचे 210 तासांचे चित्रण आहे. या दृक्श्राव्यपटावर काम करताना निदा फाजली यांच्या अलौकिक साहित्याचा पांडे यांच्यावर अत्यंतिक प्रभाव पडला. '' निदा फाजली वाचा, तुम्ही नक्कीच अधिक चांगली व्यक्ती बनाल. त्यांच्या कविता जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतात. त्यांचे अनुसरण केल्यास आपला समाज अधिक चांगला होऊ शकतो. '' असे पांडे यांनी सांगितले.

निदा फाजली यांच्या पत्नी आणि 34 वर्ष त्यांच्या सहचर राहिलेल्या  मालती जोशी फाजली यांनीही यावेळी सांगितले की, निदा फाजली म्हणायचे - "धर्म बाजूला ठेवा, संघर्षाने जीवनावर विजय मिळवा."

केरेबेटे 

हा कन्नड चित्रपट शिमोगा जिल्ह्यातल्या मलनाड प्रांतातल्या केरेबेटे या वार्षिक मासेमारी महोत्सवाभोवती केंद्रित आहे. या महोत्सवाला मोठा  लोक इतिहास आहे. दिग्दर्शक राजगुरू बी. याच प्रांतात लहानाचे मोठे झाले. या चित्रपटात नागा नावाच्या मच्छीमाराची कथा आहे. नागा आपली आई आणि प्रेयसी मीना यांच्यासोबत  जमीन खरेदी करण्याकरिता कठोर परिश्रम घेत असतो. 

नागाची भूमिका अभिनेते आणि निर्माते गौरीशंकर एस. आर यांनी साकारली आहे. या भूमिकेसाठीच्या तयारीविषयी त्यांनी सांगितले. कांताराच्या यशाचे उदाहरण देताना त्यांनी स्थानिक लोककथांवर आधारित कथांविषयी  व्यापक आकर्षण असल्याचे मत त्यांनी  व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने