ब्युरो टीम: विधानसभा निवडणुकीत नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी आणि त्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.
स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून पाचही जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती संदर्भातील उपक्रमांचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पाचही जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, स्विपचे नोडल अधिकारी आदींची यावेळी उपस्थिती होती. तसेच विभागीय आयुक्तालय येथे उपायुक्त सुभाष बोरकर, तहसीलदार पल्लवी जगताप, नगरपालिका प्रशासन शाखेचे उपायुक्त श्रीनिवास कुऱ्हे उपस्थित होते.
डॉ. गेडाम म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रवृत्त करणे, त्यासाठी मतदार जागृतीच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. पाचही जिल्ह्यात स्विपच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मतदार जनजागृती साठी राबविण्यात येणाऱ्या संकल्पना इतर जिल्ह्यातही राबविण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी केली.
स्वीपच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातही मतदार जनजागृती मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे, असे सांगून डॉ. गेडाम म्हणाले की, मागील निवडणुकीपेक्षा यावर्षीच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढावी यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने आणि व्यापक प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या सोशल मीडियाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्यामुळे या घटकाचा उपयोग मतदार जनजागृती साठी करण्यात यावा. सोशल मीडियावर सक्रिय आणि लोकप्रिय असणाऱ्या घटकांची यासाठी मदत घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
स्वीपच्या माध्यमातून होणारे विविध उपक्रम सर्व घटकापर्यंत पोहोचावे यासाठी विशेष प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. प्रत्येक पात्र मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क जरूर बजावावा, असे आवाहनही डॉ. गेडाम यांनी केले.
यावेळी पाचही जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघात स्वीपच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
गृहभेट, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी ताई, महिला बचत गट आदीच्या माध्यमातून विभागात मतदार जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय, सोशल मीडिया, एफ एम रेडिओ, बस स्थानके याठिकाणीही जिंगल्स द्वारे मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा