ब्युरो टीम : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगत असला तरी महाराष्ट्रातील काही मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांनी देखील तगडे आव्हान उभे केले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. यामध्ये काही वेळा प्राण्यांचा देखील उल्लेख केला जातोय. मात्र याच वरून आता अहिल्यानगर येथील वाघ्या फाऊंडेशनने अनोखी मागणी केली आहे. तुमच्या राजकारणात मुक्या जनावरांना ओढू नका, असे पत्रच फाऊंडेशनने प्रसिद्ध केले असून सध्या त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
तुमच्या राजकारणात प्राण्यांना आणू नका. #अहिल्यानगर येथील वाघ्या फाउंडेशनची अनोखी मागणी @SumitVarma18 pic.twitter.com/JZp5zDZICO
— मराठी Print (@Marathi_print) November 8, 2024
वाघ्या फाऊंडेशनने त्यांच्या पत्रात म्हंटले आहे की,'सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची वर्दळ सुरू आहे. या मध्ये काही राजकीय मंडळी एकमेकांविरोधात मुक्या जनावरांवरून एकमेकांना वेगवेगळ्या उपमा देत आहेत. हे काही योग्य नाही. तुम्ही तुमच्या राजकीय चिखलात मुक्या जनावरांना आणू नका. आधीच त्या बिचाऱ्यांवर लोकांचा रोष तर असतो, त्यात तुम्ही तुमच्या तोंडाला येईल ते बोलता.या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाच्या मंदिरात जाणाऱ्या रस्त्यावर चुकीच्या गोष्टी बोलून या मुक्या जनावरांवरून हिणवले जात आहे. यावर आम्हा प्राणी प्रेमींना आक्षेप आहे. खरं तर निवडणूक आयोगाने काही गोष्टींवर आचारसंहिता मांडली आहे. त्यात या गोष्टीचा देखील सामावेश असणं गरजेचं आहे. कारण कधी कुणी कोंबडी, कधी कुणी श्वानांबद्दल तर कुणी बकरी बद्दल वक्तव्य करत आहेत, हे योग्य नाही. कोणती मुकी जनावरे तुमच्या सभेत अथवा राजकारणात येत नाही. मग तुम्ही तुमच्या संस्काराचे धिंडवडे काढत असताना या जनावरांना मध्ये आणू नका, ही आमची कळकळीची विनंती. आपण आम्हा प्राणी प्रेमींच्या भावना समजून घ्याल, ही अपेक्षा, असेही या पत्रात म्हंटले आहे. या पत्रावर फाऊंडेशनचे सुमित वर्मा यांची सही आहे. सध्या या पत्राची जोरदार चर्चा सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा