Winter Season :थंडीपासून वाचण्यासाठी हिटर वापरत आहात? मग हे वाचाच



ब्युरो टीम : हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपासून  वाचवण्यासाठी लोक उबदार कपडे घालतात. तर काहीजण घर गरम करण्यासाठी रुम हिटरचा आधार घेतात. यामुळे काही मिनिटांत तीव्र थंडीपासून आराम मिळतो. पण तुम्ही नियमित घरामध्ये हिटरचा वापर करत असाल तर सावधान! कारण यामुळे थंडीपासून आराम मिळत असला तरी सातत्याने हिटरचा वापर करणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. 

रुम हिटर थंडीत खूप आराम देतात. पण हा काहीकाळाचा आराम तुमच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, हे तुम्हाला माहिती आहे का ? कारण बहुतेक हीटर्स च्या आतील बाजू मुख्यतः लाल-गरम धातूच्या रॉड्स किंवा सिरॅमिक कोर  असतात. त्यातून निघणारी उष्णता हवेतील आर्द्रता शोषून घेण्याचे काम करते. हिटरमधून बाहेर पडणारी हवा बऱ्यापैकी कोरडी असते. हे हवेतील ऑक्सिजन बर्न करते. त्यामुळे जर श्वसनाचा विकार असणारा रुग्ण असेल, तर त्याच्यासाठी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. याशिवाय हिटर त्वचेशी संबंधित विविध समस्यांचे कारण बनू शकते. हिटर आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, ते जाणून घेऊयात...

- रूम हीटर आणि ब्लोअरमधून बाहेर पडणारी कोरडी हवा तुमच्या त्वचेसाठी हानिकारक आहे. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, त्वचेला खाज सुटणे, त्वचेवर लाल ठिपके, सुरकुत्या पडणे आदी समस्या निर्माण होऊ शकते. काही वेळा त्वचेचा कोरडेपणा इतका वाढतो की खपल्या निघू लागतात.

-  तुम्हाला दमा किंवा श्वसनाचा त्रास होत असेल, तर तुम्ही हिटर जास्त वापरू नये. हिटर हवा कोरडी करतो, तसेच त्यातून हानिकारक वायू बाहेर टाकला जातो. यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याशिवाय हिटरच्या कोरड्या हवेमुळे घसा वारंवार कोरडा पडणे, जळजळ होणे, फुफ्फुसात कोरडेपणा, खाज सुटणे अशा समस्या उद्भवू शकतात. हिटरची हवा फुफ्फुसात गेल्यास कफ तयार होण्याची समस्या उद्भवू शकते.

- डोळे निरोगी ठेवण्यासाठी त्यामध्ये ओलावा असणे अत्यंत आवश्यक आहे. पण हिटरमधून निघणारी कोरडी हवा डोळ्यातील ओलावा शोषून घेते. त्यामुळे डोळ्यांना खाज सुटणे, जळजळ होणे, लालसरपणा येणे आदी समस्या निर्माण होतात. डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते.

अशी घ्या काळजी

- हिटरच्या खूप जवळ बसू नका आणि वापरण्यापूर्वी त्वचेला चांगले मॉइश्चरायझर करा.

- डोळ्यांना त्रास होत असेल तर तज्ज्ञांचे मत घेऊनच हिटर वापरावा.

- सायनस किंवा श्वसनाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी हिटर वापरताना ह्युमिडिफायर चा वापर करावा. यामुळे ओलावा टिकून राहतो.

- रात्री कधीही हिटर लावून झोपू नका. एक किंवा दोन तास तो लावा, आणि घर उबदार झाल्यानंतर ते बंद करा.

-  बेडवर, ब्लँकेट किंवा रजाईच्या आत हिटर ठेऊन ते चालू करू नका.  त्यामुळे आग लागण्याचा धोका आहे.

- हिटरचा वापर टाळणे, हे केव्हाही चांगले. पण त्यानंतरही तुम्ही तो वापरणार असाल, तर ऑइल हिटर घ्या. ते हवेला योग्य तापमानापर्यंत गरम करते.

- जेव्हा तुम्ही हिटर वापरता तेव्हा त्याच्याजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवा. यामुळे हवेतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते आणि हवेतील कोरडेपणा कमी होतो.

हिटरमुळे थंडीपासून आराम मिळतो. मात्र तासनतास त्याच्या समोर बसल्याने त्वचेचे आणि आरोग्याचे विविध प्रकारचे नुकसान होऊ शकते. हिटरचा वापर करताना सावधगिरी बाळगून या समस्या टाळता येऊ शकतात. अन्यथा त्याचा जास्त वापर जीवघेणा ठरू शकतो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने