ब्युरो टीम: कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांसाठी आयोजित पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करता येतील. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी यांनी केले आहे.
राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारणगटासाठी रक्कम रु.३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु. १५० असेल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्याच्या स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर राबविण्यात येत आहे.
अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा आदी कागदपत्रे जोडावी.
सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी तालुका पातळीवर ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये असे अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस असेल. जिल्हा पातळीवर १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये तर राज्यपातळीवर प्रथम ५० हजार द्वितीय ४० हजार तसेच तृतीय ३० हजार रुपये बक्षीस असेल.
या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. नाईकवाडी यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा