ashram shala : आश्रमशाळांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची अंमलबजावणी


ब्युरो टीम :   आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आदिवासी विभागाकडून लेंड अ हॅन्ड इंडिया या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला असून  या कराराच्या माध्यमातून इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पूर्व व्यवसाय शिक्षण देण्याचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आले आहे.

सामंजस्य करराप्रसंगी आयुक्त नयना गुंडे, अपर आयुक्त (मुख्यालय) संदीप गोलाईत, सहआयुक्त (शिक्षण) संतोष ठुबे, सहायक प्रकल्प अधिकारी आर. आर. पाटील, अनिल महाजन, संस्थेचे उपसंचालक निलेश पुराडकर, उपव्यस्थापक राजेश्वर गायकवाड, कौशल्य शिक्षण अधिकारी उमेश गटकळ, यूएनडीपीच्या अमृता भालेराव आदी उपस्थित होते.

आदिवासी विकास विभागाच्या राज्यात ४९७ शासकीय आश्रमशाळा असून त्यामध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर सन २०१४-१५ शैक्षणिक वर्षांपासून व्यवसाय शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या राज्यातील १७९ आश्रमशाळांमध्ये  इयत्ता ९  ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण देण्यात येत आहे. लेंड अ हॅन्ड इंडियाच्या सामंजस्य करारामुळे आता इयत्ता ६ ते ८ वीच्या २६ हजार ६७२ विद्यार्थ्यांना पूर्व व्यवसाय शिक्षण देण्यात येणार आहे. त्यात नाशिक अपर आयुक्तालयाच्या ११ हजार ८२५, ठाणे अपर आयुक्तालयाच्या ७ हजार ९८२, नागपूर अपर आयुक्तालयाच्या ३ हजार १६  तर अमरावती अपर आयुक्तालयाच्या ३ हजार ८४९  विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने