ब्युरो टीम : महायुतीतीतल घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून शिवसेनेच्या बरोबरीने मंत्रिपदे देण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की, ‘स्ट्राईक रेटनुसार आम्ही दोन नंबरवर आहोत. त्यामुळे आम्हालाही शिवसेनेच्या बरोबरीने मंत्रिपदे द्या, एवढीच आमची मागणी आहे.' भुजबळ यांच्या या मागणीमुळे मात्र महायुतीत मंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
'स्ट्राईक रेटनुसार आमच्यात दोन आणि तीन नंबरमध्ये थोडासा फरक आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आमचा देखील स्ट्राईक रेट चांगला आहे. मग तुम्ही आम्हाला शिवसेनेच्या बरोबरीने मंत्रिपदे द्या, एवढी आमची मागणी आहे. यावर आता जे काय आहे ते सर्व नेते बसून निर्णय घेतील. कदाचित आम्हाला (शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) सारख्या जागा देतील किंवा एखादी जागा कमी जास्त होईल,' असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाची नावे असू शकतात, याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले,'मंत्री पदाबाबत मला देखील अनेक लोक वेगवेगळी नावं पाठवतात. मात्र, हे सर्व अंदाज आहेत. शेवटी ज्या दिवशी शपथविधी असतो, त्याच्या आधी एक दिवस पक्षाकडून सांगितलं जातं असतं. किंवा मंत्रिमंडळाची सर्व यादी राज्यपालांकडे जाते, तेव्हा ती यादी खरी असते. मात्र, तोपर्यंत हे सर्व अंदाज असतात.'
टिप्पणी पोस्ट करा