Crime : राज्यपाल पद देण्याचं आमिष दाखवत शास्त्रज्ञाला घातला पाच कोटींचा गंडा



ब्युरो टीम : राज्यपाल पद मिळवून देण्याचे आमिष दाखवित तामिळनाडूतल्या शास्त्रज्ञाला पाच कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेने एका संशयित व्यक्तीला नागपुरात बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

चेन्नईतील थिरुवन्मीयूरमध्ये राहणारे व्यावसायिक व शास्त्रज्ञ नरसिम्मा रेड्डी दामोदर रेड्डी अपुरी (वय ५६) यांनी मुंबई नाका पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, नाशिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने एका संशयित व्यक्तीला अटक केली. रेड्डी यांनी ७ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०२४ या कालावधीत संशयिताला ५ कोटी ८ लाख ९९ हजार ८७६ रुपये दिले आहेत. त्यापैकी साठ लाख रुपये रोख रक्कम असून, उर्वरित पैसे स्वत:सह नातलगांच्या बँक खात्यातून रेड्डींनी संशयिताच्या बँक खात्यात जमा केले होते. संशयिताचा डाव लक्षात आल्यावर रेड्डींनी पैसे परत मागितले. त्यावेळी पैसे परत देण्यास नकार देत फोनवरून संशयिताने रेड्डींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. पोलिसांनी संशयिताला नागपूर येथून रविवारी ( ८ डिसेंबर) अटक केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने