ब्युरो टीम : आजकाल मोबाईल प्रत्येकासाठी महत्त्वाचा झाला आहे. तुमचा मोबाईल नंबर बँक अकाउंटला देखील जोडलेला असतो. अनेकदा तुम्हाला फोन करून तुमच्याकडून बँक अकाउंटसंबंधी माहिती घेण्याचा प्रयत्न सायबर गुन्हेगार करीत असतात. त्यातच आता त्यांनी व्हॉट्सॲपवर लग्नपत्रिका पाठवून फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. अशी फसवणूक होऊ नये, यासाठी काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
सायबर गुन्हेगार आतापर्यंत केवायसी, व्हेरिफिकेशन तसेच इतर मेसेज पाठवत एखादे फसवणूक करणारे ॲप डाउनलोड करण्यास सांगायचे. त्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमधील पैसे काढून घ्यायचे. पण आता ऐन लग्न सराईमध्ये सायबर गुन्हेगारांनी फसवणूक करण्याचा नवा मार्ग शोधलाय. आता ते अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲपवर खोटी लग्नपत्रिका पाठवत आहेत. ती डाउनलोड केल्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्ये तुमचं बँक अकाउंट रिकामं होऊ शकते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी अँड्रॉईड पॅकेजिंग किट अर्थात एपीके पाठवून फसवणूक करण्याचा नवा ट्रेंड सुरू केलाय.
1930 या नंबरवर करता येईल तक्रार
दूरसंचार विभागानं याबाबत एक अॅडव्हायझरी जारी केलीय. त्यानुसार व्हॉट्सॲपवर आलेल्या अज्ञात फायली उघडण्यापूर्वी काळजी घ्या. कारण सायबर गुन्हेगार तुम्हाला व्हॉट्सॲपवर बनावट एपीके फाईल पाठवू शकतात. ती फाईल डाउनलोड करताच तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. यामध्ये तुमच्या बँक अकाउंटमधून ओटीपीशिवाय पैसे काढले जातील. तुम्ही अशा कोणत्याही फसवणुकीची 1930 या नंबरवर तक्रार करू शकता.
टिप्पणी पोस्ट करा