ब्युरो टीम : भाजप नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. या भेटीत शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेले नसले तरी आता महायुतीतील तिढा जवळपास सुटण्याची चिन्हे आहेत.
फडणवीस यांनी शिंदे यांची आज वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये महायुतीच्या सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरु असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या भेटीसंदर्भात बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी सांगितले की, 'कोणत्याही मागण्यांसाठी महायुतीचं सरकार अडलेलं नाही. गिरीश महाजन यांनी देखील काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत,' असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा