Devendra Fadnavis : गटनेतेपदी निवड होताच विधानभवात देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘माझ्या सारख्या बुथ कार्यकर्त्याला...’



ब्युरो टीम : ‘माझ्या  सारख्या बुथ  कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर तीन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पदावर बसवलं. अर्थात, एकदा ७२ तासांसाठीच होतो. पण तरीही तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो. त्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा मान मोदींनी दिला. हा पक्ष त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला. त्यातूनच सामान्य कार्यकर्त्याला वेगवेगळी पदं मिळाली, काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी मोदींचे आभार मानतो. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही आभार मानतो,’ असे वक्तव्य विधानभवनात भाषण करताना भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

आज भाजपची विधीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी  महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव सूचित केले. चंद्रकांत पाटील यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांनीही फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तर आशिष शेलार आणि रविंद्र चव्हाण देणार प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यानंतर फडणवीस यांचे नाव गटनेता म्हणून निश्चित झाले. त्यामुळे आता उद्या नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात भाषण केले. 

इतर कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा राज्यघटना श्रेष्ठ 

देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, ‘संविधानाची यावेळी ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. त्यामुळे सर्वार्थानं महत्त्वाचं असं हे वर्षं आहे. मोदी नेहमी सांगतात की कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा माझ्यासाठी देशाचं संविधन सर्वात महत्त्वाचं आहे. या संविधानाने प्रत्येक भारतीयाला जगण्याचा, मोठं होण्याचा अधिकार दिला. भारताला उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं. संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात पुन्हा सरकार स्थापन करतोय,’ असे सांगतानाच ते पुढे म्हणाले, ‘सरकारमध्ये असताना आपल्याला सगळ्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करता येत नाहीत. पण आपण एक मोठं ध्येय घेऊन राजकारणात आलो आहोत. फक्त पदांसाठी आलेलो नाही. त्यामुळे मला पूर्ण अपेक्षा आहे की येत्या काळात काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील, काही गोष्टी मनाविरुद्ध होतील. तरीही आपण सगळे व्यापक हितासाठी एकत्र काम करू आणि आपली शक्ती दाखवून देऊ.’


जनतेला घातला साष्टांग दंडवत

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, 'यावेळची निवडणूक ऐतिहासिक अशी होती. या निवडणुकीचं विश्लेषण करायचं जर झालं तर या निवडणुकीनं आपल्यासमोर एक गोष्ट निश्चित केली आहे. ती म्हणजे एक है, तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है. मोदींच्या नेतृत्वात देशात विजयाची मालिका लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने दिलेल्या कौलानंतर जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो.’ 

महायुतीतील मित्रपक्षांचे मानले आभार

याप्रसंगी फडणवीस यांनी महायुतीतील मित्रपक्षांचे आभार मानले. ते म्हणाले, ‘मी एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे आभार मानतो. आरपीआयचे नेते रामदास आठवले आणि आमच्या सर्व मित्रपक्षांचेही आभार मानतो. तसेच मी सगळ्यांचे आभार मानतो की विधिमंडळ गटनेता म्हणून सगळ्यांनी माझी निवड केली.’

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने