ब्युरो टीम : भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यानंतर फडणवीसांनी अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह राजभवन गाठलं. राज्यपालांची भेट घेत त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर तिघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मात्र असं काही घडलं ज्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, तुम्ही दादांसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? त्यावर शिंदे म्हणाले, 'आताच देवेंद्रजींना याबद्दल सांगितलंय. मी पण तेच सांगतोय, तुम्ही थोडं थांबा. संध्याकाळपर्यंत थांबा. शपथविधी उद्या आहे. त्याला अजून वेळ आहे.'
राजकारणात कायमस्वरूपी लक्षात ठेवावा लागेल असा #व्हिडिओ
— मराठी Print (@Marathi_print) December 4, 2024
तुम्ही दादांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? एकनाथ शिंदेंना पत्रकारांचा प्रश्न, अजित दादांंकडून मज्जेदार उत्तर. झाला एकच हास्यकल्लोळ#MaharashtraCM #MaharashtraElection2024 #DevendraFadnavis #DevendraFadnavis4Maha… pic.twitter.com/GVPxv5PpfQ
शिंदे उत्तर देत असताना अजित पवार मध्येच बोलले. 'संध्याकाळपर्यंत त्यांच्या शपथविधीचं समजेल. पण मी तर शपथ घेणार आहे. माझं ठरलंय,' असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर एकच हास्यकल्लोळ उडाला. अजित पवारांचं मिश्किल विधान ऐकून सारेच हास्याची कारंजी उडाली. शेजारी बसलेल्या शिंदे, फडणवीस यांनाही हसू आवरता आलं नाही.
अजित पवारांच्या मिश्किल विधानावर सगळे हसत असताना एकनाथ शिंदेंनी संधी साधली आणि टोला लगावला. 'दादांना संध्याकाळी शपथ घ्यायचाही अनुभव आहे आणि सकाळी शपथ घेण्याचाही अनुभव आहे,' असं शिंदे म्हणाले. त्यानंतर पुन्हा एकदा खसखस पिकली.
टिप्पणी पोस्ट करा