health :१३ लाख विद्यार्थ्यांना दिली जाणार जंतनाशक गोळी, कारण..



विक्रम बनकर (अहिल्यानगर) : राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम  ४ डिसेंबर  २०२४ रोजी अहिल्यानगर  जिल्ह्यामधील ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रामध्‍ये एकूण ५,८५२ अंगणवाडी केंद्रा मधून ३,४६,८४८ लाभार्थ्‍यांना तसेच ५,७७१ शासकिय, अनुदानित व खाजगी शाळांमधून ९,५५,४०६ शालेय विद्यार्थ्यांना असे एकूण १३,०२,२५४ लाभार्थ्‍यांना जंतनाशक गोळी देण्‍यात येणार आहे.

जागतिक आरोग्‍य संघटनेच्‍या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील अंदाजे २८ टक्‍के मुलांना आतडयामध्‍ये वाढणारे परजीवी जंतापासून धोका आहे. आतड्यांतील कृमी दोष हा बालकांमध्ये व किशोरवयीन मुला मुलींमध्ये होणा-या रक्तक्षय व कुपोषणास मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. यामुळे मुला मुलींच्या शिक्षणावर व पुढील आयुष्यातील मिळकतीवर याचा विपरीत परिणाम होतो. तिव्र प्रमाणात कृमी दोष असलेले विद्यार्थी हे बरेचदा आजारी असतात. त्यांना लवकर थकवा येतो व अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करु शकत नाही. यामुळे बरेचदा शाळेत अनुपस्थित असतात. आतड्यांतील कृमी दोष हे वैयक्तीक व परिसर अस्वच्छतेमुळे होतात. बालकांमध्‍ये याचा प्रसार दुषित मातीद्वारे फार सहजतेने होतो. शाळा व अंगणवाडी पातळीवरुन देण्यात येणारी जंतनाशक गोळी ही फार परिणामकारक आहे.

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा उद्देश १ ते १९ वयोगटातील सर्व मुलामुलींना अंगणवाडी, शाळा या ठिकाणी जंतनाशक गोळी देऊन त्‍यांचे आरोग्‍य चांगले ठेवणे. तसेच पोषणस्थिती, शिक्षण व जिवनाचा दर्जा उंचावणे हा आहे.

मोहिमेच्‍या नियोजनासाठी जिल्‍हयातील सर्व प्राथमिक आरोग्‍य केंद्र/ग्रामिण रुग्‍णालये/नगरपालिका दवाखाने व महानगर पालिका येथिल सर्व वैदयकिय अधिकारी,कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्‍यात आले आहे.

राष्ट्रीय जंतनाशक दिन ( ४ डिसेंबर २०२४) या दिवशी शाळेमधील ६ वर्ष ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुलां-मुलींना तसेच अंगणवाडी केंद्रामध्‍ये १ ते ६ वर्ष वयोगटातील सर्व मुलांमुलींना जंतनाशक गोळी देण्‍यात येणार आहे. जे लाभार्थी सदर दिवशी आजारी असेल किंवा इतर कारणामुळे गोळी घेणे शक्‍य झाले नाही, त्‍यांना १० डिसेंबर २०२४ रोजी शाळा व अंगणवाडी केंद्रामध्‍ये मॉप अप दिनी गोळी देण्‍यात येणार आहे.

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेकरीता मा. जिल्‍हाधिकारी, अहिल्यानगर यांचे अध्‍यक्षतेखाली जिल्‍हास्‍तरीय समिती गठीत करण्‍यात आली आहे. सदर दिवशी १ ते १९ वर्ष वयोगटातील अंगणवाडी, शालेय विदयार्थी व शाळाबाहय मुले-मुली यांनी जंतनाशक गोळी घेण्‍याचे आवाहन मा. जिल्‍हाधिकारी, श्री. सिद्धाराम सालीमठ, मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी जि.प. अहिल्यानगर, श्री. आशिष येरेकर, मा. जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी   डॉ. बापुसाहेब नागरगोजे, मा. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने