journalist health : पत्रकारांचे आरोग्य चांगले राहिल्यास विकासात्मक पत्रकारिता बहरणार, किरण मोघे यांचे प्रतिपादन



ब्युरो टीम : सतत तणावपूर्ण जीवनशैलीत काम करणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्यासाठी मराठी पत्रकार परिषदेने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. चूकीची आहार पध्दती, व्यायामाचा अभाव व तणावपूर्ण जीवनशैलीचा पत्रकारांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. पत्रकारांचे आरोग्य चांगले राहिल्यास सर्वसामान्यांचे प्रश्‍न सुटून विकासात्मक पत्रकारिता बहरणार असल्याचे मत जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे यांनी मांडले. तर स्पर्धा व धावपळीच्या कामात पत्रकारांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
 मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन पत्रकार आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात आला. शहरात मराठी पत्रकार परिषदने डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या सहकार्याने मंगळवारी (दि.3 डिसेंबर) सावेडी येथील अर्बन हेल्थ सेंटर मध्ये आयोजित केलेल्या पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी मोघे बोलत होते.
प्रारंभी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूर शेख, डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश मोरे, विभागप्रमुख (पीएसएम) डॉ. शुभदा अवचट, प्रा. डॉ. भगवंत पायघन, पत्रकारांच्या अधिस्विकृती समिती नाशिक विभागाचे सदस्य विजयसिंह होलम, परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत नेटके, ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, विठ्ठल लांडगे, सुभाष चिंधे, बंडू पवार, श्रीराम जोशी, दिलीप वाघमारे आदींसह पत्रकार, वृत्तछायाचित्रकार व माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे मोघे म्हणाले की, पत्रकारांची सर्वात जुनी असलेल्या मराठी पत्रकार परिषदेला मोठा इतिहास आहे. पत्रकार हा सामान्य माणसांच्या प्रश्‍नासाठी कार्यरत राहतो. मात्र त्यांच्या प्रश्‍नांसाठी ही संघटना अविरतपणे कार्य करत आहे. शहरातील पत्रकारांपासून ते ग्रामीण भागातील पत्रकारांपर्यंतचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य परिषदेच्या माध्यमातून सुरु आहे. पत्रकारांचे प्रश्‍न सोडवून त्यांच्या मागे उभी राहणारी ही सर्वात मोठी संघटना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात सूर्यकांत नेटके यांनी 85 वर्ष पूर्ण झालेल्या मराठीत पत्रकार परिषदेचे पत्रकारांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेतला. तर राज्यात एकमेव पत्रकारांची मातृसंस्था असलेले हे संघटन पत्रकारांच्या आरोग्यासह इतर महत्त्वाचे प्रश्‍न देखील सोडवून, त्यांच्या अडचणीत उभी राहत असल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ. सतीश मोरे म्हणाले की, पत्रकारांच्या धकाधकीचे जीवन व लाईफ स्टाईलमुळे अनेक आजार त्यांना जडत आहे. वेळीच आरोग्य तपासणी करुन त्याचे निदान होणे आवश्‍यक आहे. पत्रकारांच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे मधुमेह, हृदय व उच्च रक्तदाब तपासणी वेळोवेळी करणे आवश्‍यक आहे. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व मेडिकल कॉलेजचे संचालक डॉ. अभिजित दिवटे यांच्या सूचनेनुसार वर्षभर पत्रकारांची मोफत तपासण्या व सवलतीच्या दरात उपाचर केले जाणार असल्याचे जाहीर केले. तर पत्रकार त्यांच्या सोयीनुसार आपल्या आरोग्याच्या मूलभूत तपासण्या मोफत करु शकणार असल्याचे स्पष्ट करुन, आरोग्यासाठी पत्रकारांच्या पाठिशी विखे पाटील फाउंडेशन उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात पत्रकारांच्या ब्लड प्रेशर, शुगर लेव्हल, हिमोग्लोबिन यासह विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. योग शिक्षिका सुरची यांनीही यावेळी पत्रकारांना निरोगी आरोग्यासाठी व ताण-तणाव व्यवस्थापनावर योगाचे धडे दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य प्रसिध्दीप्रमुख संदीप कुलकर्णी यांनी केले. आभार डिजिटल मीडियाचे परिषदेचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी मानले.

एड्स विषयी जनजागृती

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी एड्स विषयी जनजागृती करणारे पथनाट्य सादर केले. तसेच मराठी पत्रकार परिषद आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या वतीने एड्स विषयक जनजागृती करणारी रॅली काढण्यात आली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने