ब्युरो टीम : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर आज भीमसागर लोटल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. त्यानंतर केलेलं भाषण हे फडणवीस यांचे शपथविधीनंतरचं पहिलंच भाषण होतं. या भाषणात त्यांनी संविधानानुसारच काम करण्याची ग्वाही जनतेला दिली.
'भारत एवढी प्रगती करतोय त्याचं श्रेय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला आहे. जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि उत्तम संविधान कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे. कारण हे संविधान सामान्य व्यक्तीच्या जीवनात सामाजिक-आर्थिक परिवर्तन करण्याचा मूलमंत्र समोर ठेवून तयार करण्यात आलेलं आहे. त्यामुळेच आज कोणत्याही समस्येचा उपाय संविधानात पाहायला मिळतो. आम्ही जे कार्य करू, ते संविधानाला अनुसरूनच करू. समाजातल्या वंचिताचाच विचार पहिल्यांदा आमच्या सर्वांच्या मनात असेल,' अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेला दिली.
भाजपाच्या कार्यकाळात संविधानावर आघात केले जात असून ते बदलण्याचे प्रयत्न होत असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेनंतरच्या पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'संविधानानुसारच कारभार चालणार,' अशी ग्वाही दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा