ब्युरो टीम : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांबाबत मोठया प्रमाणात समाजात चूकीचे संदेश व अफवा पसरविण्यात येत आहेत. अश्या संदेशांची सत्यता पडताळण्यासाठी विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द माहितीची विद्यार्थी व पालकांनी खात्री करुन घेणे गरजेचे आहे.
परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, 'परीक्षेबाबत विविध समाज माध्यामांद्वारे लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांबाबत अफवा व चूकीचे संदेश पसरविण्यात येत आहे. परिक्षार्थीनी कुठल्याही समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या संदेशांवर, अफवांवर विश्वास ठेवू नये. तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे. अशाप्रकारे चूकीचे संदेश, अफवा पसरविणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,' असे त्यांनी सांगितले.
हिवाळी सत्र-2024 च्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा राज्यातील एकूण शंभरपेक्षाअधिक परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे. विविध विद्याशाखांच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेकरीता सुमारे 30,902 विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाकडून काळजी घेण्यात येत आहे. तरी संलग्नित महाविद्यालय प्रमुख, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी याबाबत सजग रहावे असे विद्यापीठाकडून आवाहन करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा