vijay stambh perne phata :विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज


ब्युरो टीम: पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सर्व संबंधित शासकीय यंत्रणांच्या समन्वयाने आणि विविध संघटनांच्या सहकार्याने यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांची कोणतीही गैरसोय होणार नाही तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा त्यांना पुरविण्यात येतील, असे ते म्हणाले.

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संघटनांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे शहर पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा बार्टीचे महासंचालक सुनील वारे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पुणे- शिरुर प्रांताधिकारी स्नेहा किसवे- देवकाते, हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने आदी उपस्थित होते.

विजस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना पिण्याचे पाणी, वापराचे पाणी, स्वच्छतागृह आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, औषधोपचार आदी सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. गतवेळीपेक्षा यावेळी शौचालयांची संख्या वाढविण्यात आली असून २ हजार शौचालये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. २१ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली असून आवश्यकता असल्यास अधिक ठिकाणी तशी व्यवस्था करण्यात येईल.

परिसरात उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या वाहनतळ, वैद्यकीय तपासणी, शौचालये आदी सुविधांचे चिन्हांकन (सायनेजेस) व कलर कोडिंग करण्यात येणार असून सुविधांच्या ठिकाणी विविधरंगी बलून लावण्यात येणार असल्याने तात्काळ त्या सुविधांचा लाभ घेणे अनुयायांना शक्य होणार आहे. समाज माध्यमातून  या सुविधांची माहिती मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात येईल.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, पोलीस विभागाशी समन्वय साधून विजयस्तंभाकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर चोख वाहतूक नियोजन करण्यात येईल. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. अनुयायांना वाहन तळापासून विजयस्तंभ परिसरात ने आण करण्यासाठी जास्तीत जास्त बसेस देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पीएमपीएमएल बसेसची संख्याही वाढविण्यात आली आहे. परिसरात सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा (पीएएस) कार्यान्वित करण्यात येणार असल्याने गर्दीचे नियंत्रण व्यवस्थित करणे शक्य होईल.

विजयस्तंभाचे चांगल्या प्रकारे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण करण्यात येणार असून मार्गावर प्रकाशव्यवस्था करण्यात येणार आहे.

आषाढी वारीच्या धर्तीवर विजयस्तंभाकडे येणाऱ्या मार्गावरील गावात राहणाऱ्या कुटुंबांनी आपल्या स्वच्छतागृहांची सुविधा अनुयायांना उपलब्ध करुन द्यावी, तसेच ग्रामपंचायतींनीही आपल्या निधीतून या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींना सूचना देण्यात येतील. तशी व्यवस्था करण्याची तयारी काही ग्रामपंचायतीची दर्शविली आहे.

कार्यक्रम संपल्यावर परतीच्या मार्गावर असणाऱ्या अनुयायांसाठी बसेसचे नियोजन केले जाईल. तसेच मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या अनुयायांना मेट्रो स्थानकाबाहेरून कार्यक्रमाला येण्यासाठी बसेसचे नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत विविध संघटनांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींनी उपयुक्त सूचना केल्या असून त्या सूचनांचा आदर ठेऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सकारात्मकरित्या अंमलबजावणी केली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी विविध कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख, विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने