Vikhe Patil vs Thorat : राधाकृष्ण विखे पाटलांची बाळासाहेब थोरतांवर जोरदार टीका, म्हणाले 'तेव्हाच सांगितलं होतं आधी...'


ब्युरो टीम :  ‘मी तेव्हाच जाहीर सांगितलं होतं की पहिलं आमदार म्हणून निवडून या’, अशी खोचक टीका भाजपचे आमदार माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे. ते साम टिव्ही या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचाही पराभव झाला. यामध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचाही पराभव झाला. तेथून शिवसेना पक्षाचे अमोल खताळ निवडून आले. दरम्यान,आता  थोरात यांच्याबाबत बोलताना विखे पाटील यांनी खोचक टीका करत सूचक इशाराही दिला आहे.

'अहिल्यानगर जिल्ह्यात काहीजण प्रस्थापित होते. त्यांच्या मतदारसंघात अनेकवर्ष काम करत असताना सर्वसामान्य माणसांचं त्यांनी शोषण केलं. त्यांनी लोकांची अडवणूक केली. त्यामुळे केव्हातरी उद्रेक व्हायला पाहिजे होता, तो झाला. नगर जिल्ह्यात एक परिवर्तन झालं. हे परिवर्तन फक्त सुरुवात आहे, आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील अशाच प्रकारचं चित्र दिसेल. जेव्हा बाळासाहेब थोरातांचे त्यांच्या मतदारसंघात भावी मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लावले होते, तेव्हाच मी जाहीर सांगितलं होतं की पहिलं आमदार म्हणून निवडून या. आता त्या ठिकाणी जनतेनं अमोल खताळ यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला,' असं म्हणत विखे पाटील यांनी थोरातांवर टीका केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने