ब्युरो टीम : भारतातील बहुतांश भागात सध्या कडाक्याची थंडी पडू लागली असून त्याचा दैनंदिन कामांवरही परिणाम होतोय. त्यातही, थंडीच्या दिवसात गाडी सुरू करणं मोठं आव्हानचं असतं. गाडी सुरू केल्यानंतर ती चालवताना सुद्धा याकाळात विविध समस्या उद्भवतात. पण काळजी करू नका, कारण आज आम्ही तुम्हाला तुमच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी हिवाळ्यात तुम्ही तुमच्या कारची काळजी कशी घेऊ शकता, याबाबत टिप्स देत आहोत. ज्या अंमलात आणल्यास तुम्हाला हिवाळ्यात गाडी चालवताना कोणतीही अडचण येणार नाही.
हिवाळ्यात अशी घ्या गाडीची काळजी
अशी करा गाडी सुरू
तुम्ही सकाळी तुमचं कोणतेही पेट्रोल, डिझेल किंवा ईव्ही वाहन सुरू केल्यानंतर लगेच ते चालवू नका. तर गाडी सुरू केल्यानंतर थोडावेळ जागेवर उभी राहू द्या. त्यानंतर गाडी हळू हळू पुढे न्या.
टायर तपासा
हिवाळा सुरू होण्याआधी टायर्स चांगल्या स्थितीत आहेत की नाही, हे तपासा. कारण निसटत्या रस्त्यावर ड्रॉ इव्हिंग दरम्यान स्किडिंगची शक्यता वाढते. त्यामुळे टायरमध्ये हवा व्यवस्थित आहे ना, हे तपासलं पाहिजे.
इलेक्ट्रिक वाहनांची काळजी घ्या
भारतात ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वाहनांची लोकप्रियता वाढत आहे. मात्र थंडीच्या दिवसात त्यांची काळजी कशी घ्यायची, हा मोठा प्रश्न आहे. मात्र, त्यासाठीही काही टिप्स आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईव्ही वाहने खूप थंड तापमानात घेऊन बाहेर पडू नका. ही वाहने पार्किंग केल्यानंतर त्यावर कव्हर टाकून झाकून ठेवा. कारण ईव्हीमध्ये वापरण्यात येणारी लिथियम आयन बॅटरी गोठू शकते. अशावेळी शक्य असल्यास तुम्ही गाडीची बॅटरीही काढून ठेऊ शकता.
गाडीमध्ये टूलबॉक्स ठेवा
बर्याचदा लोक गाडीतून टूलबॉक्स काढून बाहेर ठेवतात. मात्र, हिवाळ्यात टूलबॉक्स हा गाडीमध्येच ठेवा. कारण दुर्देवानं कोणतीही आपत्कालिन परिस्थिती उद्भवली, तर हा टूलबॉक्स उपयोगी येऊ शकतो.
लाइट बदला
हिवाळ्यामध्ये तुमच्या गाडीला फॉग लाइट लावा. तसेच गाडीमधील हिटर व्यवस्थित सुरू आहे ना, याची खात्री करा.
इंजिन तपासा
गाडीची बॅटरी आणि इंजिन प्रामुख्यानं थंड हवामानात प्रभावित होऊ शकते. त्यामुळे गाडी सुरू करताना अनेक समस्या उद्भवू शकतात. जर बॅटरी जुनी असेल, तर ती बदला. अन्यथा बॅटरीच्या सर्व केबल्स आणि त्यामधील पाण्याची पातळी तपासा. इंजिन तेल आणि कूलंट देखील तपासा, आणि आवश्यक असल्यास बदला. कारण कमी तापमानात द्रव गोठू शकतात.
ब्रेक तपासा
जर तुम्ही हिवाळ्यात बर्फाच्छादित भागात प्रवास करत असाल, तर गाडीचा ब्रेक लावताना अडचण येऊ शकते. अशावेळी थंडीचा ऋतू सुरू होण्यापूर्वीच ब्रेक सर्व्हिस करा. कॅलिपर ब्रेकला स्वच्छ आणि ग्रीस करवून घ्या.
टिप्पणी पोस्ट करा