baramati : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा बारामतीत


ब्युरो टीम: ‘23 वी छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2024- 25’ चे 15 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत रेल्वे मैदान, बारामती येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी दिली आहे. 

ऑलिम्पिकपटू स्वर्गीय खाशाबा जाधव यांचा जन्मदिन ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली 15 जानेवारी रोजी सांयकाळी 6 वा. उद्धाटन होणार आहे, यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.

राज्यातील कबड्डी खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत खेळण्याची संधी प्राप्त व्हावी, कबड्डी क्रीडाप्रेमी, प्रेक्षकांना दर्जेदार खेळाडूंचा खेळ व त्यांचे कौशल्य बघता यावे, याकरीता राज्य शासनामार्फत राज्यस्तरीय पुरुष व महिलांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धे’चे आयोजन करण्यात येते. बारामती शहर व परिसरात कबड्डी खेळाची विविध अद्ययावत प्रशिक्षण केंद्रे असून यामधून विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू घडलेले आहेत. बारामती शहराला सन 2009-10 व आता दुसऱ्यांदा या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग

कबड्डी क्रीडाप्रमेंना प्रो कबड्डी स्टार- अजित चौहान, शिवम पठारे, प्रणय राणे, आकाश शिंदे, संकेत सावंत, विशाल ताठे, शंकर गदई, सुनील दुबिले, जयेश महाजन, श्रेयस उबरदंड, आम्रपाली गलांडे, सलोनी गजमल, रेखा सावंत, हरजीत संधू, सोनाली शिंगटे, दिव्या गोगावले, समरीन बुरोंडकर, मंदिरा कोमकर, यशिका पुजारी, कोमल देवकर या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा दर्जेदार व कौशल्यपूर्ण खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच उदयोन्मुख खेळाडूंना या खेळाडूंचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.

जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना अशा क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळावी याकरीता महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष तथा उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीने  महानगरपालिका क्षेत्राला जिल्ह्याचा दर्जा देण्यात येऊन शहर व जिल्हा संघ सहभागी होईल असा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातून पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा असे एकूण 3 संघ सहभागी होणार आहे.

सन 2024-25 मध्ये आयोजित होणारी स्पर्धा ही साखळी व बाद फेरी पद्धतीने खेळविली जाणार असून 15 ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत सांयकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत रेल्वे मैदानावार प्रकाशझोतात सामने होणार आहेत. स्पर्धेला महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने तांत्रिक सहकार्य पुरविले आहे.

स्पर्धेतील सहभागी संघ:

स्पर्धेत महाराष्ट्र कबड्डी संघटनेच्या वरिष्ठगट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमधील गुणानुक्रमे प्रथम 12 संघ व विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या वरिष्ठगट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमधील गुणानुक्रमे प्रथम 4 असे एकुण 16 महिला व 16 पुरुष असे एकूण 32 संघ सहभागी होणार आहेत. खेळाडू, व्यवस्थापक तसेच तांत्रिक अधिकारी असे सर्व संघांचे मिळून अंदाजे 548 व्यक्ती सहभागी होणार आहेत.

वैयक्तिक बक्षीसे:

प्रत्येक दिवशी उत्कृष्ट पकड करणारा, उत्कृष्ट चढाई करणारा व सर्वोत्कृष्ट खेळाडू असे 3 पुरुष व 3 महिला यांना प्रत्येकी 5 हजार रुपये तर संपूर्ण स्पर्धेत सामन्यामध्ये उत्कृष्ट पकड करणारा, उत्कृष्ट चढाई करणारा व सर्वोत्कृष्ट खेळाडू असे 3 पुरुष व 3 महिला यांना प्रत्येकी 25 हजार रुपये याप्रमाणे रोख बक्षीस दिले जाणार आहे.

निवास व भोजन व्यवस्था:

स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू, व्यवस्थापक तसेच तांत्रिक अधिकारी यांच्याकरीता निवास व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल, पुणे (बारामती) मार्केट यार्ड परिसर याठिकाणी करण्यात आली आहे. खेळाडूंना दर्जेदार व सकस भोजन देण्यात येणार आहे.

क्रीडांगण व्यवस्था:

रेल्वे मैदानावर अदययावत मॅटची मैदाने तयार करण्यात आलेली असून प्रेक्षकांकरीता 12 टप्प्यांचे (स्टेप) भव्य बैठक प्रेक्षकागृह उभारण्यात आले आहे. या स्पर्धेच्या आयोजनाकरीता राज्यशासनावतीने 75 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिलेला आहे तसेच आयोजन समितीच्या वतीने स्थानिक पातळीवर 1 कोटी 25 लाख रुपयाचा निधी उभारण्यात आलेला आहे. 

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 19 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित राहणार आहेत. उद्धाटन व पारितोषिक वितरण समांरभांप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, राज्यातील प्रादेशिक नृत्ये व संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय फटाक्यांची आतषबाजी व नेत्रदीपक लेझर शो होणार आहे.


बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या 23 व्या छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, क्रीडासंस्था, क्रीडासंघटना, क्रीडामंडळांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह द्विगुणीत करावा तसेच दर्जेदार कबड्डी खेळाचा आनंद घ्यावा.

- जितेंद्र डुडी, छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजन समितीचे कार्याध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, पुणे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने