Happy New Year : नवीन वर्षात आर्थिकदृष्ट्या स्वतःला सक्षम करायचं आहे? मग नववर्षाचा संकल्प करण्यापूर्वी ही बातमी वाचाच...

 


ब्युरो टीम : नवीन वर्षाचं स्वागत करताना रिझोल्यूशन अर्थात संकल्प निश्चित करणं, ही फार पूर्वीची परंपरा आहे. नवीन वर्ष 2025 सुरू झाले आहे. त्यामुळे आता नवीन संकल्प करण्याची वेळ आली आहे. चला तर, आज आम्ही तुम्हाला अशा ‘मनी रिझोल्यूशन’ बाबत माहिती देत आहोत, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

तुमच्या आर्थिक स्थितीचं पुनरावलोकन करा

तुमच्या आर्थिक स्थितीचं एकूण पुनरावलोकन हा मूलभूत गोष्टी पाहण्याचा उत्तम मार्ग आहे. या पुनरावलोकनामध्ये तुमचं एकूण उत्पन्न,  कर्जाचा हप्ता (EMI),  घरगुती खर्च आणि चालू गुंतवणुकीसह तुमच्या सर्व आर्थिक पैलूंचा समावेश असावा. या प्रकारचं पुनरावलोकन तुम्हाला तुमच्या आर्थिक मालमत्ता आणि कर्जाबद्दल अचूक माहिती देईल. येत्या वर्षासाठी बजेट तयार करण्यासाठी या गोष्टीचा विचार करा, आणि ती अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. घाईघाईनं खरेदी करणं टाळा, आणि तुमच्या गुंतवणुकीशी शिस्तबद्ध राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आर्थिक नियंत्रणासाठी आणि पैशाशी संबंधित तणाव दूर ठेवण्यासाठी ही गोष्ट प्रत्येक महिन्याला अंमलात आणा.

कर्ज कमी करा

कर्ज तुमच्या आर्थिक आरोग्यावर परिणाम करतात. तुम्ही नवीन वर्षात प्रवेश करताच, सक्रियपणे स्वतःवरील कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या खर्चाचा आढावा घ्या, आणि अनावश्यक खर्चापासून दूर राहा. मोठी खरेदी टाळण्याचा प्रयत्न करा, आणि सध्याचे कर्ज फेडण्यासाठी बचत केलेले पैसे वापरा. तुमच्या कर्जावरील खर्च हा नियंत्रणात राहावा, यासाठी तुमच्या भविष्यातील कर्जावर मर्यादा घालण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याव्यतिरिक्त कमी कर्ज हे तुम्हाला मानसिक शांती सुद्धा देईल.

कमाई वाढवा

महागाई हा जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. वाढत्या महागाईमुळे  तुमच्या जीवनमानावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी तुमचं उत्पन्न देखील वाढलं पाहिजे. नोकरदार व्यक्ती ते नोकरी करीत असलेल्या ठिकाणी पगार वाढीसाठी प्रयत्न करू शकतात, किंवा चांगल्या पगाराची दुसरी नोकरी शोधू शकतात. तुमची कौशल्यं आणि क्षमता वापरूनही तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवू शकता. याशिवाय, उत्पन्न वाढवण्यासोबतच खर्चावर नियंत्रण ठेवण्यास विसरू नका. यामुळे  तुम्ही तुमची बचत वाढवू शकता. ही बचत एकतर गुंतवणूक म्हणून वापरली जाऊ शकते किंवा आपत्कालीन निधी म्हणून सुद्धा तिचा वापर होऊ शकतो.

गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवा

आर्थिक संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणूक महत्त्वाची आहे. जर तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात केली नसेल, किंवा तुमचे उत्पन्न आणि गुंतवणुकीचे प्रमाण योग्य नाही असे तुम्हाला वाटत असेल,  तर या संदर्भात पावले उचलण्याची वेळ आली आहे. तुमच्या एकूण उत्पन्नाचा एक चतुर्थांश हिस्सा तुमच्या गुंतवणुकीकडे गेला पाहिजे. तुम्ही तुमचं वय आणि तुमची जोखीम घेण्याची क्षमता यावर आधारित ही रक्कम निश्चित करू शकता. गुंतवणुकीचा निर्णय घेताना तुमच्या आर्थिक उद्दिष्टांचे मूल्यमापन करणेही महत्त्वाचं आहे.

तुमची जोखमी घेण्याची क्षमता कमी ते मध्यम असल्यास, खात्रीशीर रिटर्न देणार्‍या पर्यायांचा विचार करा. यामध्ये पोस्ट ऑफिस बचत, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) यांचा समावेश आहे. ठेवींच्या व्याजदरात सुधारणा झाल्यामुळे तुम्ही एफडी आणि आरडी सारख्या बँक ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्यास तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ओरिएंटेड हाइब्रिड स्कीम, बॅलेंस्ड एडवांटेज फंड, मल्टी-एसेट किंवा मल्टी-कॅप फंड यासारख्या पर्यायांचा विचार करू शकता.

तुम्हाला गुंतवणूक करताना मोठी जोखीम टाळायची असेल, तर प्युअर इक्विटी म्युच्युअल फंडासारख्या इक्विटी पर्यायांचा विचार करा. यामध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप, फ्लेक्सी-कॅप, सेक्टरल स्कीम्स आणि इंडेक्स फंड यांचा समावेश आहे. जर तुम्हाला शेअर बाजाराच्या चांगली माहिती असेल, तर तुम्ही थेट शेअर्सचा देखील एक संधी म्हणून विचार करू शकता. गुंतवणुकीची निवड करताना टॅक्सची बचत हा महत्त्वाचा घटक विचारात घेतला पाहिजे. पण केवळ तोच घटक विचारात न घेता, इतरही गोष्टींचा विचार केला पाहिजे. पीपीएफ, एनएससी आणि इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स (ईएलएसएस) सारखी गुंतवणूक हे काही असे पर्याय आहेत, जे तुम्हाला यासाठी मदत करू शकतात. होम लोनवरील मुद्दल आणि व्याज भरणे, हा आयकर कायद्यांतर्गत टॅक्स कमी करण्याचा आणखी एक मार्ग आहे.

विमा घ्या

आजच्या काळात टर्म आणि मेडिकल इन्शुरन्स खूपच आवश्यक झाला आहे. दुर्देवानं जर तुमच्यावर अचानक वैयक्तिक किंवा आरोग्यसंबंधी संकट आलं, तर अशावेळी पुरेसं विमा संरक्षण तुमच्या बचत आणि गुंतवणुकीचं रक्षण करण्यास मदत करते. तुम्हाला विम्याच्या प्रीमियममधूनही टॅक्स सूट मिळू शकते.

‘सुरुवात चांगली झाली, तर निम्मे काम झाले,’ ही म्हण वैयक्तिक आणि आर्थिक बाबींसाठी तंतोतंत लागू पडते. तुमच्यापैकी बहुतेकांसाठी संकल्प करणं सोपं आहे. पण संबंधित संकल्पाचे पालन करणं कठीण आहे. मात्र, जेव्हा पैशांचा प्रश्न येतो, तेव्हा शिस्त आणि संयम तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवतात, व तुमच्या संकल्पावर ठाम राहण्यास मदत करतात. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात आर्थिकदृष्ट्या तुम्हाला सक्षम करू शकतील, असे संकल्प नक्की करा.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने