Marathi : पीसीएमसी आयोजित डिजिटल साहित्य संमेलनातील वक्ते म्हणतात...


ब्युरो टीम :- आजकाल प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सर्वच ठिकाणी डिजिटल पद्धतीने कामकाज सुरु झाले असून आजच्या या डिजिटल युगात मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उपक्रमाचे औचित्य साधत डिजिटल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या साहित्य संमेलनच्या निमित्ताने मराठी साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर व्हावा, अशा अपेक्षा  सहभागी झालेल्या साहित्यिकांनी व्यक्त केल्या आहेत. 

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने १४ जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान  ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका देखील  विविध उपक्रम राबवत आहे. नुकताच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्या अनुषंगाने यंदा महानगरपालिकेने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मैत्री पुस्तकांशी, सामुहिक पुस्तक वाचन, डिजिटल साहित्य संमेलन यांसारखे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. डिजिटल साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जगभरातील मराठी भाषिकांना जोडण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिका करत आहे.  

या उपक्रमाचा मुख्य उद्देश मराठी वाचन, साहित्य आणि संस्कृती यांचे जतन आणि संवर्धन करणे हा आहे. सर्व समाज घटकांना एकत्र आणून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार सर्व घटकांमध्ये करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. या डिजिटल साहित्य संमेलनात लेखक, कवी, साहित्य निर्मितीची आवड असणाऱ्यांनी  दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला होता. 

डिजिटल माध्यमांवर साहित्य लेखन करणाऱ्या शीतल दरंदळे यांनी या परिषदेत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी  मराठी साहित्य निर्मिती करणाऱ्या नवोदित साहित्यिक, कवी, लेखकांना मोलाचे मार्गदर्शन केले. डिजिटल माध्यमांवर मराठी साहित्य लेखनाची गरज काय, हे देखील त्यांनी आकडेवारीसह विषद केले. या लेखकांनी घाईत पुस्तक छापण्यापेक्षा डिजिटल माध्यमांवर प्रथम लिखाणास सुरुवात करावी. या लिखाणास वाचकांचा मिळणारा प्रतिसाद विचारात घेऊन  पुस्तक छापण्याच्या विचार करावा, असा सल्ला देखील त्यांनी नवोदित लेखकांना दिला. 

वाचनाच्या सवयींमुळे मानसिक अडथळे दूर करणे, विशेषतः तरुण वाचकांसाठी वाचन महत्व  यावर लेखिका तृप्ती मुंडे यांनी संमेलनात भाष्य केले. तसेच, वाचनाची सवय कशी लावायची याबाबत सोपे मार्ग सुचवून मराठी साहित्य वाचनाचे महत्त्व सांगितले. तर, रुपाली सोनवणे यांनी मराठी भाषा आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे संवर्धन का आवश्यक आहे, याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. तसेच, या कामासाठी तळागाळातील प्रयत्नांचे महत्त्व स्पष्ट केले.

या संमेलनासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी दीपक पवार, पंकज पवार, सुनीता पाटील, हेमंत घाडगे, अनिल राठोड बिनिश सुरेंद्रन यांनी परिश्रम घेतले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी भावसार यांनी केले. डिजिटल साहित्य संमेलन राबविल्याबद्दल लेखक, कवींनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला धन्यवाद दिले.

विकिपिडीयावर मराठी साहित्य वाचणाऱ्यांची संख्या दोन कोटी

सोशल मिडीयावर साहित्य लेखन करणाऱ्या लेखकांना विकिपीडिया सारखे व्यासपीठ उपलब्ध असल्याचे सांगत त्यावर कसे लिखाण करावे, याबाबतही साहित्य संमेलनात मार्गदर्शन करण्यात आले. विकिपिडीयावर मराठी साहित्य वाचणाऱ्याची संख्या महिन्याला २ कोटी आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य अधिक वाचले जाते. सध्या विकिपिडीयावर मराठी भाषेतील ९९ हजार १३० लेख आहेत. ही संख्या वाढायला हवी, असे मत देखील साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या साहित्यिकांकडून व्यक्त करण्यात आली.

डिजिटल साहित्य परिषदेच्या माध्यमातून मराठी साहित्याचा समृद्ध वारसा अधोरेखित करण्याचा आणि डिजिटल युगात त्याचे महत्त्व जपण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वांना मराठी संस्कृतीत योगदान देण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. 

-  शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक,  पिंपरी चिंचवड महानगरपालिका 


राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा’ साजरा केला जातो. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. अशा वेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे डिजिटल साहित्य परिषद हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर संवाद, सर्जनशीलता आणि सहकार्याला प्रेरित करणारे एक व्यासपीठ आहे, जे मराठी भाषेचा वारसा पुढील पिढ्यांसाठी टिकून राहण्यास सहाय्यक ठरेल.

-  किरण गायकवाड, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा संवर्धन समन्वयक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने