Ahilyanagar :सावेडीतील 'या' भागातील थकबाकीदारांकडे १० कोटींहून अधिक थकबाकी


विक्रम बनकर, अहिल्यानगर : मालमत्ता करावरील शास्तीमध्ये १०० टक्के सवलत देऊनही अनेक थकबाकीदारांनी कर भरलेला नाही. त्यामुळे सर्व प्रभाग समिती कार्यालयाच्या क्षेत्रातील २ लाखांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर जप्ती कारवाई सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकट्या सावेडी प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीतील १३८ मोठ्या थकबाकीदारांकडे १०.९० कोटींची थकबाकी आहे. यात शासकीय कार्यालयांकडे १.८९ कोटी रुपये थकीत आहेत. थकबाकीदारांनी तत्काळ थकीत कर भरावा. अन्यथा जप्ती कारवाई केली जाईल, असा इशारा अहिल्यानगर महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

वाचा : पुण्यातील धक्कादायक घटना, स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार

महानगरपालिकेने करावरील शास्तीमध्ये १०० टक्के सवलत दिली होती. या कालावधीत अपेक्षित वसुली न झाल्याने आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. पाणी योजनेची वीज बिले व इतर देणी थकीत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने वसुलीसाठी कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीतील दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या करदात्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यात शासकीय कार्यालयांचाही समावेश आहे. 

सावेडी प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीत दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेले १३८ थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे १०.९० कोटींची थकबाकी आहे. यात महाराष्ट्र शासन सामाजिक न्यायभवन समाज कल्याण ऑफिस, महाराष्ट्र राज्य वि सोसा वैदयकीय प्र अधिकारी नाशिक, डिस्ट्रीक्ट सुप्रिटेंडेट ऑफ पोलीस, तोफखाना पोलीस स्टेशन अ.नगर नगरपरीषद जागा, बि.एम. मंडळ, डिस्ट्रीक्ट सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, कार्यकारी अभियंता शासकीय विश्रामगृह (भीमा), आयकर विभाग (क्वार्टरस नं. 1 ते 3 व 4.), जि.प. शाळा भुतकरवाडी प्राथमीक शाळा, जिल्हा बियाने अधिकारी तालुका बीज गणन केंद्र, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी सावेडी, मा. जिल्हा पोलिस अधिक्षक नगर, नगर तालुका सेतु कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नगर तालुका तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तालुका निरीक्षक भूमिअभिलेखा, विशेष भूसंपादन अधिकारी, जिल्हा अधिकारी रो.ह.यो भो निवडणूक ऑफिस, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग (सर्कल ऑफिस), सब डिव्हिजन ऑफिसर आरोग्य व बांधकाम, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ बि. लॉ.कॉलनी सावेडी अशी १८ शासकीय कार्यालये असून त्यांच्याकडे १.८९ कोटी रुपये थकीत आहेत. सर्व थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्यावर जप्ती कारवाई सुरू केली जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी तत्काळ थकीत कर भरावा व जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने