ब्युरो टीम : अहिल्यानगर महानगरपालिकेला वीज बिले, कर्मचाऱ्यांची देणी, पुरवठादार व ठेकेदारांची देणी यासह शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये स्वहिस्सा अशी सुमारे ४४६.८० कोटी रुपयांची देणी आहेत. त्याचा परिणाम विकास कामे रखडण्यावर व नागरी सुविधांवर होत आहे. सदरची देणी येत्या दोन वर्षांत देण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन उपाययोजना करत आहे. मात्र, नागरिकांकडून कर भरणेही अपेक्षित आहे. सध्या देण्यात आलेली शास्ती माफी ही अंतिम संधी आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत शास्तीमध्ये सवलत मिळणार नाही. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या थकीत कराचा भरणा तत्काळ करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
महानगरपालिकेच्या सेवा व सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन उत्पन्न वाढविण्याबाबत उपाययोजना करत आहेत. सध्याची आर्थिक परिस्थिती सातत्याने नागरिकांसमोर मांडत आहे. आजमितीला महानगरपालिकेला ४४६.८० कोटी रुपयांचे देणे आहे. यात १९९० पर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाणी योजना असतानाच्या काळातील जुनी थकीत वीज बिले २५० कोटी, शासकीय योजनांचा स्वहिस्सा १६० कोटी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ७ कोटी, पाचवा व सहावा वेतन आयोग फरक २ कोटी, पथदिवे व पाणी योजनेचे चालू वीजबिल ११ कोटी, अशुद्ध पाणी आकार २ कोटी, पेन्शनर सातवा वेतन आयोग फरक २ कोटी, निवृत्ती वेतन अंशदान मनपा हिस्सा ३ कोटी, अर्जित रजा वेतन १ कोटी, वैद्यकीय बिले ५० लक्ष, टँकरद्वारे पाणीपुरवठा २ कोटी, बससेवा तूट १ कोटी, कंत्राटी कर्मचारी देयके १ कोटी, कचरा संकलन देयके ३ कोटी, खतनिर्मिती प्रकल्पाची देयके १ कोटी, डिसेंबर वेतन कपात १.५० कोटी, ठेकेदारांची देयके ४० कोटी, पुरवठादारांची देयके ५ कोटी, शिक्षण मंडळ वेतन हिस्सा १.२० कोटी, दिव्यांग मानधन १.६० कोटी, इतर देणी १ कोटी अशी ४४६.८० कोटींचा समावेश आहे.
उत्पन्न वाढवण्यासाठी महानगरपालिका ठोस उपाययोजना करत आहे. मात्र, त्याबरोबरच कर वसुली हा महानगरपालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत असल्याने वसुलीवर अधिक भर देत आहे. थकबाकीदारांना शास्तीमध्ये १०० टक्के सवलत दिली आहे. त्याचा लाभ घेऊन कर भरणे आवश्यक आहे. यापुढे महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत शास्तीमध्ये सवलत देणार नाही. त्यामुळे हीच अंतिम संधी असल्याने नागरिकांनी थकीत कराचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे. वसुलीसाठी महानगरपालिकेने आक्रमक कारवाई सुरू केली आहे. जप्ती कारवाई टाळण्यासाठी तत्काळ कर भरावा, अन्यथा कारवाईशिवाय पर्याय नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा