विक्रम बनकर, अहिल्यानगर : 'पारनेर बसस्थानकाच्या नवीन इमारतची आपण सर्वात प्रथम चार साडेचार वर्षांपूर्वी,मार्च २०२० मध्ये तत्कालीन परिवहन मंत्र्यांकडे मागणी केली. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा केला.इमारतीच्या कामाला मंजुरी मिळवली. असे असताना विरोधक म्हणतात की, आमच्या कामाचे श्रेय घेऊ नका. जे काम मी आणले, त्यांचे भूमिपूजन मीच करणार ना? दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करण्याची मला गरजच काय?,' असा सवाल करीत खासदार नीलेश लंके यांनी विरोधकांवर शरसंधान साधले.
पारनेर बसस्थानक इमारतीच्या २ कोटी ६६ लाख रूपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन लंके यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी रोहोकले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे,माजी सभापती गंगाराम बेलकर,सुदाम पवार, नगराध्यक्ष नितीन अडसूळ, उपनगराध्यक्षा जायदा शेख, प्रियांका खिलारी, खंडू भूकन,मारूती रेपाळे,राहुल झावरे, डॉ.बाळासाहेब कावरे, बाजार समितीचे संचालक बापू शिर्के,किसन सुपेकर,किसनराव रासकर, योगेश मते, पुनम मुंगसे व्यासपीठावर उपस्थित होते.
लंके पुढे म्हणाले, 'आमदार म्हणून मी सकारात्मक काम केले. त्यामुळेच हजारो कोटी रूपयांची विकास कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळेच तालुका विकासात अग्रेसर असल्याचे चित्र आहे. मतदारसंघात मी प्रामाणिक काम केले, म्हणूनच मतदारांनी मला लोकसभेत पाठवले. पारनेर बसस्थानकाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मी आमदार झाल्यापासून बसस्थानकासाठी माझा पाठपुरावा सुरू होता. आज या कामाचा शुभारंभ होतोय, याचा आनंद आहे. नव्या बसस्थानकामुळे पारनेरचा चेहरा मोहरा बदलणार आहे. बस स्थानकाच्या कामाचे कोणी श्रेय घेतले, तर जनतेला ते कसे पटेल? काल आलेले विरोधक आम्ही काम मंजूर केले असल्याचे सांगत आहेत. विकास कामांसाठी ठराविक प्रक्रिया असते, त्यासाठी मी सन २०२० पासून पाठपुरावा केला. आज या कामाचे भूमिपूजन करताना आनंद होत आहे,' असे सांगतानाच लंके यांनी विरोधकांना टोला लगावला.
टिप्पणी पोस्ट करा