ब्युरो टीम : केंद्र सरकारतर्फे दरवर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण’ ही स्पर्धा घेतली जाते. देशभरातील विविध शहरे या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखील ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत ‘नागरिकांचा अभिप्राय’ यासाठी देखील गुण राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला या स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपला अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपलिका राबवत असलेल्या स्वच्छता सर्वेक्षण पाहणीसाठी केंद्र शासनातर्फे एक पथक येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या शहरांसाठी काही निकष घालून दिले असून, त्या माध्यमातून याचे परीक्षण करून शहराला मानांकन दिले जाते. यामध्ये नागरिकांच्या अभिप्राय देखील महत्त्वाचा असून त्यासाठी राखीव गुण ठेवण्यात आले आहेत. त्यामुळेच पिंपरी चिंचवड शहराला अव्वल क्रमांक प्राप्त करण्यासाठी आधिकाधिक नागरिकांनी त्यांचे अभिप्राय ३१ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाइन नोंदवणे आवश्यक आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षणासाठी समितीतर्फे पाहणी लवकरच सुरु होणार असून ही समिती सर्वेक्षण काळात नागरिकांशी संवाद साधणार आहे.
असा नोंदवा अभिप्राय
- सर्वात प्रथम नागरिकांनी https://sbmurban.org/feedback या संकेतस्थळावर जावे.
- त्यानंतर स्वतःचा मोबाईल क्रमांक टाका आणि पसंतीची भाषा निवडा
- राज्य या पर्यायात ‘महाराष्ट्र’ आणि जिल्हा या पर्यायात ‘पुणे’ निवडा
- युएलबी पर्यायात ‘पिंपरी चिंचवड’ निवडा
- त्यानंतर तुमच्या समोर येणाऱ्या प्रश्नांचे योग्य उत्तर द्या
- तुमच्या मोबाईलवर येणारा ओटीपी टाकून अर्ज सबमिट करा
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराचा अव्वल क्रमांक यावा, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका विविध उपक्रम राबवत आहे. या सर्वेक्षणामध्ये शहरातील स्थानिक नागरिकांचे अभिप्राय देखील महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी त्यांचे अभिप्राय नोंदवणे गरजेचे असून नागरिकांनी आपले अभिप्राय नोंदवत आपले शहर स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल आणण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ मध्ये पिंपरी चिंचवड शहर अव्वल यावे, यासाठी स्वच्छतेविषयी नागरिकांचे अभिप्राय देण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन भरून देण्यात यावेत. तसेच आपल्या शहरात स्वच्छता राहावी, यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करणे आवश्यक आहे.
- सचिन पवार, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
टिप्पणी पोस्ट करा