PMC : संरक्षण खात्याची जागा पुणे महापालिकेला हस्तांतरित, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश


ब्युरो टीम : मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी संगमवाडी येथील संरक्षणदलाची जागा या प्रकल्पासाठी पुणे महापालिकेला हस्तांतरित करण्यात आली आहे. या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत पाठपुरावा केला होता. त्यानंतर सिंह यांनी मोहोळ यांना सदर जागा हस्तांतरित केल्याचे पत्र पाठविले आहे. या जागा हस्तांतरणामुळे या प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे.

पुणे शहरात मुळा-मुठा नद्यांचा एकात्मिक पद्धतीने विकास करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रकल्प सुरु असून मुळा-मुठा या नद्यांची शहरातील एकूण लांबी ४४.४० किलोमीटर आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची एकूण ११ भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली असून यापैकी संगमवाडी ते बंडगार्डन पूल (स्ट्रेच-९) या स्ट्रेचमध्ये संरक्षण विभागाची (सादलबाबा दर्गा ते संगमवाडी स्मशानभूमी या दरम्यानची ) जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु होती. संरक्षण विभागाकडील एकूण १७ एकर इतके क्षेत्र मिळण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत जागा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव संरक्षण विभागाकडे सादर करण्यात आला होता. याच अनुषंगाने पुण्याचे खासदार असलेल्या केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी संरक्षण विभागाकडे पाठपुरावा केला.

याबाबत माहिती देताना खासदार मोहोळ म्हणाले, ‘प्रकल्पासाठी आवश्यक जागेत काम करण्यास परवानगी मिळाली असून ही जागा ताब्यात आल्याने नागरिकांसाठी या जागेत पब्लिक प्लेसेस, विविध सुविधा, ओपन जिम, गार्डन, इ. करिता नदीकाठसुधार प्रकल्पास लागून वापर करणे शक्य झाले आहे. या संदर्भात पुणे महापालिका प्रशासनाला पुढील कार्यवाही आणि प्रत्यक्ष कामे वेगाने करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत’.

‘२०१४ आधी संरक्षण दलाची जागी कोणत्याही नागरी सुविधांसाठी मिळवायची असल्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वर्षानुवर्षे पाठपुरावा करुनही प्रकल्पांसाठी जागा मिळत नव्हत्या. मात्र २०१४ नंतर मोदी सरकारच्या कार्यकाळात नागरी प्रकल्पांचे गांभीर्य आणि गरज ओळखून प्रक्रिया गतिमान पद्धतीने केल्या जात आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत संरक्षण खात्याने गतिमानता दाखवल तातडीने प्रक्रिया केल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे समस्त पुणेकरांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो’, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने