ब्युरो टीम : ‘भारतीय संविधानाला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. या अमृत महोत्सव वर्षपूर्तीबद्दल भारतीय संविधानाला सांगितिक महामानवंदना देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने भारतीय संविधानाचा विचार नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कौतुकास्पद काम केले आहे. यानिमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतीय संविधानाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आदर्शवत ठरली आहे,’ असे गौरवाद्गार केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रजासत्ताक दिनी दि. २६ जानेवारी रोजी ‘आम्ही भारताचे लोक’ (हम भारत के लोग) हा भारतीय संविधानाला महामानवंदना देण्यासाठी भव्य सांस्कृतिक विश्वविक्रमी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात नेपाळ देशासह भारतातील विविध राज्यातून आलेल्या दिडशे कलाकारांनी सांकेतिक भाषेसह तब्बल १६ भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे गायन करून इतिहास घडवला होता. या ऐतिहासिक सोहळ्याची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली. या विश्वविक्रमाबद्दलचा प्रमाणपत्र प्रदान सोहळा दुबई येथे भारत सरकारचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
भारत सरकारचे निवृत्त प्रधानसचिव डॉ. विश्वपती त्रिवेदी, संयुक्त अरब अमिराती चेंबर्स फेडरेशनचे महासचिव हमीद मोहम्मद बिन सालेम, दुबई वर्ल्ड ट्रेंड सेंटरचे कार्यकारी उपाध्यक्ष माहिर अब्दुलकरीम झुल्फर, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. संतोष शुक्ला, मध्यपूर्वचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र मतलानी, संयुक्त अरब अमिराती अल मख्तुम फाऊंडेशनचे विश्वस्त मिर्झा अल साहेग , संयुक्त अरब अमिराती वायुसेनेचे कार्यकारी संचालक मोहम्मद माझमी, डॉ. बहार अलहुदी, इब्राहिम याहूद आदींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाऊंडेशनचे प्रमुख कबीर नाईकनवरे यांनी हा सन्मान स्वीकारला. सुमारे ४० देशांचे प्रतिनिधी या सोहळ्यास उपस्थित होते.
सुप्रसिद्ध गायक कबीर नाईकनवरे आणि सहकाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या गायनाचा ‘हम भारत के लोग’ हा सांगितिक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमातून भारतीय संविधानाच्या मूल्यांचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.
@pcmcindiagovin #pcmc प्रजासत्ताक दिनी आम्ही भारताचे लोक’ हा भारतीय संविधानाला महामानवंदना देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली. याचे प्रमाणपत्र दुबई येथे केंद्रीय राज्यमंत्री @RamdasAthawale यांच्या हस्ते महापालिकेला देण्यात आले@shekhardalal pic.twitter.com/IjF9ma0cIE
— मराठी Print (@Marathi_print) February 20, 2025
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, भारत हा शांतीचा संदेश जगाला देणाऱ्या गौतम बुद्धांचा देश आहे. समतेची मूल्ये त्यांनी रुजवली. हा विचार भारतीय संविधानात आपल्याला पाहायला मिळतो. भारतीय संविधानात असलेली मूल्ये एकतेचा संदेश देत असून प्रत्येकापर्यंत हा विचार पोहोचल्यास विकासाचा मार्ग अधिक गतिमान आणि व्यापक होईल. पिंपरी चिंचवड महापालिकेने सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संविधानाचा हा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. भारतीय संविधानाच्या प्रचार प्रसारासाठी महापालिकेने केलेले कार्य कौतुकास्पद असून सर्वांसाठी आदर्शवत असल्याची भावना आठवले यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच असा विशेष कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल त्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह कार्यक्रमाचे संयोजन करणाऱ्या चमूचे अभिनंदन देखील केले.
भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार करुन त्यातील मूल्यांना अभिप्रेत कृती प्रत्येकाने करणे हे आपले कर्तव्य आहे. महापालिकेने आयुक्त शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाचा विचार जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या संविधानाला दिलेल्या महामानवंदनेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली. त्याबद्दल महापालिकेचा केलेला गौरव शहरासाठी भूषणावह आहे.
-चंद्रकांत इंदलकर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
टिप्पणी पोस्ट करा