Shivjayanti : शिवछत्रपतींच्या जयघोषात अहिल्यानगरी दुमदुमली


ब्युरो टीम : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार,  जिल्हा प्रशासन अहिल्यानगर आणि जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहिल्यानगरतर्फे शहरात  माळीवाडा बसस्टँड शेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून 'जय छत्रपती शिवाजी जय भारत'  पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. हलगी-संबळ वादन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित जीवंत देखावे आणि पारंपरिक खेळांच्या चित्तथरारक सादरीकरणाने शिवकाळ उभा केला.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेचा शुभारंभ केला. आमदार संग्राम जगताप आणि श्री. सालीमठ यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि शिव प्रतिमेला अभिषेक करून पूजन करण्यात आले. यावेळी जिजाऊ वंदना करण्यात आली आणि शिवाजन्माचा पाळणा सादर करण्यात आला.

यावेळी  जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक अमोल भारती, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष रामचंद्र दरे आदी उपस्थित होते. 

पदयात्रेत विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या पथकांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जीवंत देखावे सादर केले. पर्यावरण संरक्षण, वाहतुकीचे नियम,  अवयवदानाचे संदेशही पदयात्रेच्या माध्यमातून देण्यात आले. विद्यार्थी-विद्यार्थिनी पारंपरिक वेशात पदयात्रेत सहभागी झाले. 

जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, युवक मंडळे, क्रीडा मंडळांचे लेझिम आणि ढोल पथकांचे सादरीकरण पदयात्रेचे विशेष आकर्षण होते. वारीचा देखावाही यावेळी सादर करण्यात आला.  पदयात्रेत अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 

यावेळी पोलिस बँड पथकाने देशभक्तीपर गीते सादर केली. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  विशाल गणपती, आशा टॉकीज , मराठा मंदिर सायकल मार्ट , मेन कापड बाजार,  टेली खुंटी चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट, नील क्रांती चौकमार्गे पुढे जाईल आणि रेसिडेन्सीयल कॉलेज येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने