विक्रम बनकर, अहिल्यानगर : शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेल्या “पीएम किसान योजना” (PM Kisan Yojana) चा १९वा हप्ता नुकताच वितरित केला आहे. मात्र, दुसरीकडे पीएम किसान योजनेच्या नावाने बनावट संदेश पाठवून त्याद्वारे सायबर गुन्हेगारांनी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी WhatsApp, SMS किंवा सोशल मीडियावरून आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, असे आवाहन अहिल्यानगर येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. या योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत १९ हप्ते देण्यात आले आहेत. मात्र आता या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत कृषी अधिक्षक सुधाकर बोराळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
अशी होतेय फसवणूक
सुधाकर बोराळे यांनी सांगितले की, ' सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना WhatsApp ग्रुपवर PM Kisan list. APK किंवा PM Kisan APK या संदेशची लिंक येत आहे. शेतकऱ्यांनी या लिंकवर क्लिक करताच APK फाइल मोबाईलमध्ये डाउनलोड होते, आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत आहे. तरी शेतकऱ्यांनी मोबाईलवर PM Kisan list. APK किंवा PM Kisan APK या संदेशची लिंक उघडू नये, किंवा सदर लिंक चा वापर शेतकऱ्यांनी करू नये. शेतकऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अशी घ्या काळजी
- अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या कोणत्याही लिंकला क्लिक करू नका. ती शेअर करू नका.
- पीएम किसान बरोबरच बँकाच्या नावाने आलेल्या एपीके फाइल या डाऊनलोड करू नका
- आपल्या बँक खात्याचे डिटेल्स, ओटीपी कोणाकडेही शेअर करू नये.
- आर्थिक फसवणूक झाल्यास १९३० या टोल फ्री क्रमांकावर तातडीने कॉल करा.
पहा व्हिडीओ
टिप्पणी पोस्ट करा