विक्रम बनकर, अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरामध्ये पुर्व वैमनस्यातुन तरूणाचे अपहरण करून त्याचा खून करीत पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वैभव शिवाजी नायकोडी ( वय १९, रा.ढवणवस्ती, अहिल्यानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तोपखाना पोलिसांनी पाच आणि स्थानिक गुन्हे शाखेने पाच अशा एकूण दहा आरोपींना पकडण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री साडे आठच्या सुमारास सिमा शिवाजी नायकोडी (रा.ढवणवस्ती, अहिल्यानगर) यांचा मुलगा वैभव शिवाजी नायकोडी हा घरातुन केस कापण्यासाठी गेला, परंतु तो घरी परत आला नाही. याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनला २५ फेब्रुवारी २०२५ रोजी वैभव नायकोडी हा मुलगा हरवल्याबाबत नोंद करण्यात आली.
२७ फेब्रुवारी २०२५ रोजी फिर्यादी सिमा शिवाजी नायकोडी यांनी त्यांचा मुलगा वैभव यास लपका नावाचा मुलगा व त्याचे तीन अनोळखी साथीदार यांनी स्वीफ्ट कारमधुन बळजबरीने पळवुन घेऊन गेले, याबाबत माहिती मिळाली असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी तपास सुरू करीत वैभव नायकोडी याच्या अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये अनिकेत उर्फ लपक्या विजय सोमवंशी, (रा.एमआयडीसी), सुमित बाळासाहेब थोरात (रा.गजानन कॉलनी, नवनागापूर), महेश मारूतराव पाटील (रा.नवनागापूर, एमआयडीसी) व नितीन अशोक नन्नावरे (रा.नवनागापूर, एमआयडीसी) अशांना ताब्यात घेतले. परंतु तपासामध्ये आरोपीकडून अपहरण केलेला पिडीत हा आमच्या ताब्यातून गोल्डन प्लॉटींग, वडगाव गुप्ता येथून पळून गेला, त्यानंतर तो कोठे गेला याबाबत काही एक माहित नसल्याचे सांगण्यात आले.तसेच आरोपी उडवाउडवीची माहिती देऊ लागले.
पोलीस अधीक्षक यांनी अपहरणाच्या घडलेल्या घटनेबाबत ताब्यात घेण्यात आलेले आरोपी तपासामध्ये संशयास्पद माहिती सांगत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हयाचा समांतर तपास करणेबाबत आदेश दिले. त्यानुषंगाने आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार संदीप पवार, फुरकान शेख, गणेश धोत्रे, शाहीद शेख, रविंद्र घुंगासे, प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक नेमुण गुन्ह्यातील पिडीताचा शोध घेणेबाबत सूचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
असा घेतलं आरोपींचा शोध
वैभव नायकोडी हा गोल्डन प्लॉट येथून पळून गेला अशा मिळालेल्या माहितीवरून २ मार्च २०२५ रोजी पथकाने गोल्डन प्लॉटींग, वडगाव गुप्ता येथील आसपासचे परिसरातील विहीर, शेत, काटवन, डम्पींग ग्राऊंड व निर्जन ठिकाणी पिडीताचा शोध घेतला. घटना ठिकाणाचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून, तोफखाना पोलीस स्टेशनने ताब्यात घेतलेल्या आरोपी व्यतिरीक्त इतर आरोपी निष्पन्न केले. निष्पन्न आरोपींना अहिल्यानगर व नवनागापूर, एमआयडीसी परिसरात शोध घेऊन ताब्यात घेतले. आरोपींची नावे विशाल दिपक कापरे (वय २२, रा.चेतना कॉलनी, नवनागापूर, एमआयडीसी), विकास अशोक गव्हाणे (वय २३, रा.वडगाव गुप्ता, ता.जि.अहिल्यानगर), करण सुंदर शिंदे ( वय २४, रा.शिवाजीनगर, नवनागापूर, एमआयडीसी), रोहित बापुसाहेब गोसावी (वय २०, रा.गजानन कॉलनी, नवनागापूर, एमआयडीसी), स्वप्नील रमाकांत पाटील (वय २३, रा.साईराजनगर, नवनागापूर, एमआयडीसी) असे आहेत.
खून करून मृतदेह जाळला
ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता विशाल दिपक कापरे याने सांगितले की, तोफखाना पोलीस स्टेशनला अटक असलेले व ताब्यातील आरोपी अशांनी मिळून मागील भांडणाचे कारणावरून मयत वैभव शिवाजी नायकोडी यास दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी तपोवन रोड, अहिल्यानगर येथून कारमधुन एमआयडीसी परिसरातील मोकळया जागेत व एका अपार्टमेंट नेऊन सर्वानी मारहाण करून जीवे ठार मारले. त्यानंतर २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारच्या वेळी मयताचा मृतदेह कारमधुन केकताई परिसर विळद घाट येथे नेऊन, मृतदेह लाकूड व डिझेलचा वापर करून पेटवून जाळून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मयताची हाडे व राख याची विल्हेवाट लावली. ताब्यातील पाच आरोपींना गुन्हयाचे तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हा तपास केला.
पहा व्हिडीओ
टिप्पणी पोस्ट करा