Ahilyanagar : रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांनी होणार दंड

ब्युरो टीम : अहिल्यानगर बाजारपेठेतील दुकानदार रात्री दुकाने बंद केल्यानंतर जाताना कचरा रस्त्यावर टाकून जातात. महापालिकेची घंटागाडी या भागात नियमित येते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी घंटागाडीतच कचरा टाकणे आवश्यक आहे. यापुढे व्यापाऱ्यांनी घंटागाडीतच कचरा टाकावा, रस्त्यावर कचरा टाकल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे. 

रविवारी सकाळी मध्यवर्ती शहरात डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम पार पडली. यावेळेत आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी बाजारपेठेतील कचऱ्याची पाहणी करून व्यापाऱ्यांना कचरा घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन केले आहे. शहरात अप्पू चौक ते सबलोक पंप ते भिंगारवाला चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा, शहाजी रोड, तेलिखुंट, नवीपेठ परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यात रस्त्यावरील कचऱ्यासह प्लास्टिक व इतर कचरा मोठ्या प्रमाणात संकलित करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्यासह महापालिका कर्मचारी, डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सभासद, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोहिमेवेळी बाजारपेठ परिसरातील दुकानदारांनी रस्त्यावर टाकलेला कचरा पाहून आयुक्त यशवंत डांगे यांनी नाराजी व्यक्त केली. या भागात नियमित घंटागाडी येत आहे. तरीही व्यापारी दुकान बंद केल्यानंतर रात्रीच्या वेळी कचरा दुकानासमोर रस्त्यावर टाकतात. अशा प्रकारे रस्त्यावर कचरा टाकल्यास व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने