विक्रम बनकर, अहिल्यानगर : मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी केवळ सावेडी प्रभाग कार्यालयाने जप्ती कारवाई केली आहे. थकबाकीदारांना शास्ती माफ करूनही अपेक्षित वसुली झालेली नाही. वसुलीसाठी कठोर कारवाई करण्याच्या सूचना असतानाही कारवाया होत नसल्याने व वसुली वाढत नसल्याने आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सावेडी वगळता इतर तीनही प्रभाग समिती कार्यालयाच्या प्रभाग अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. थकबाकीदार कर भरत नसतील तर तत्काळ मालमत्ता जप्त करा, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यशवंत डांगे यांनी मंगळवारी महानगरपालिकेत सर्व विभागांच्या कामाचा आढावा घेतला. कर वसुलीचा आढावा घेत असताना सहा थकबाकीदारांवर कारवाई करत आठ मालमत्ता सील केल्याची माहिती सावेडी प्रभाग कार्यालयाने दिली. त्यानंतर आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी इतर प्रभाग अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. मार्च अखेरपर्यंत थकीत मालमत्ता कर, पाणीपट्टीची जास्तीत जास्त थकबाकी वसूल करण्यासाठी प्रभाग अधिकारी व वसुली कर्मचाऱ्यांनी तत्काळ जप्ती कारवाई सुरू करावी, असे स्पष्ट आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले.
बैठकीत नगररचना विभागातील कामकाज सुकर व जलदगतीने होण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार १०० दिवसांच्या कृती आराखड्यातील उर्वरित कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना आदेश दिले. महानगरपालिकेच्या बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेत रस्त्यांची व इतर प्रकल्पांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना सूचना द्याव्यात. काम पूर्ण होण्यासाठी सतत पाठपुरावा करावा, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा