ब्युरो टीम : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्याकंडे सादर केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे, अशी घोषणा प्रसार माध्यमांसमोर दिली. आपण हा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवल्याचे, मुंडे यांना पदमुक्त केल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, 'धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे.'
तर, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात मला कल्पना नव्हती. आज सकाळी नागपूरला आल्यावर समाज माध्यमांवरून ही माहिती मिळाली. या संपूर्ण घटनेचा तपास सुरू असल्यापासून माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे. मी सर्वात आधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती केली होती. चौकशी समितीने दोषारोप पत्र सादर केल्यानंतर समोर आलेले व्हीडीओ पाहण्याची माझ्यात हिंमत नाही. हा अमानवी प्रकार आहे. या संपूर्ण प्रकारावर मी संतोष देशमुखच्या आईची माफी मागते. मी सुद्धा एक आई आहे. त्यामुळे अशा अमानवी घटनांमुळे त्यांच्यावर काय परिणाम झाले असतील हे मी समजू शकते, असे म्हणत पंकजा मुंडेंना अश्रू अनावर झाले. धनंजय मुंडेंनी आधीच राजीनामा दिला असता तर पदाची प्रतिष्ठा राहिली असती. मी त्याची लहान बहीण असून कुठल्याही परिवारासाठी ही दु:खद घटनाच आहे,' असेही त्या म्हणाल्या.
टिप्पणी पोस्ट करा