ब्युरो टीम : आजच्या धावपळीच्या व ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे कमी वयातच विविध आजार होण्याचा धोका वाढला आहे. सकस आहाराच सेवन न करणे, बिघडलेली जीवनशैली यामुळे डायबेटिस सारखा आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळेच डायबेटिस आता केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तरुण-तरुणीही या आजाराला बळी पडत आहेत.
काही वर्षांपूर्वी या आजाराची लक्षणे वृद्धांमध्ये दिसत होती. पण आता हा आजार फक्त वृद्धांपुरता मर्यादित राहीला नाही. तर आता तरुण आणि तरुणीही या आजाराला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत या आजाराची लक्षणे लवकर ओळखून योग्य ती पावले उचलल्यास त्यावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य आहे. चला तर, या आजाराशी संबंधित काही महत्त्वाचे संकेत आणि टिप्स जाणून घेऊ.
दोन प्रकार
डायबेटिस आजाराचे दोन प्रकार असतात, ते म्हणजे टाइप 1 डायबेटिस आणि टाइप 2 डायबेटिस. भूक जास्त लागणे, विनाकारण वजन कमी होणे, थकवा येणे, वारंवार लघवी होणे अशी डायबेटिसची लक्षणे आहेत. तर, चुकीच्या खाण्याच्या सवयी, नियमित व्यायाम न करणे, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा अशी काही डायबेटिस होण्याची कारणे आहेत.
लक्षणे काय?
एखाद्या व्यक्तीला वारंवार तहान लागत असेल आणि जास्त लघवी होत असेल, तर हे शरीरातील शुगर लेव्हल वाढण्याचं लक्षण असू शकते. शरीरात शुगर लेव्हल जास्त असल्यानं किडनी ग्लुकोज फिल्टर करू शकत नाहीत, त्यामुळे वारंवार तहान लागते. जेव्हा शरीराला आवश्यकतेनुसार इन्सुलिन मिळत नाही, तेव्हा शरीर ऊर्जेसाठी चरबी आणि स्नायू तोडण्यास सुरुवात करते, ज्यामुळे वजन कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही चांगला आहार घेत आहात पण तुमचे वजन सतत कमी होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तर, तातडीने तपासणी करून तुम्हाला डायबेटिस तर नाही ना, याची खात्री करा.
काळजी घ्या
डायबेटिस झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा हा आजार होऊ नये, यासाठी काळजी घेणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी नियमित व्यायाम, योग्य जीवनशैली, पौष्टिक अन्नाचे सेवन, धुम्रपान टाळणे, फायबर युक्त आहाराचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते.
टिप्पणी पोस्ट करा