विक्रम बनकर, अहिल्यानगर : 'उत्तम शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हीच बालकांच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य मोहिमेबद्दल जागरूक राहून बालकांच्या आरोग्याची तपासणी करून घेत त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवा,' असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांनी केले.
शहरातील कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कुलमध्ये राष्ट्रीय बालस्वास्थ्य मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
हेही वाचा : कमी वयातील व्यक्तीमध्येही दिसतात डायबेटिसची लक्षणे, नेमकं कारण काय? वाचा
हेही वाचा : दुचाकीवर यायचा, महिलांच्या गळ्यातील दागिने चोरायचा, पोलिसांनी असा पकडला गुन्हेगार
कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिवशंकर वलांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद काकडे, मनपाचे आरोग्य अधिकारी सतिष राजूरकर, जिल्हा समन्वयक विजय दळवी, रोटरीचे अजय पिसोटे, शाळेच्या मुख्याध्यापिका लिटील रोझ, शाळेच्या संचालिका ॲन तेरेस आदी उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण म्हणाले, 'राज्य शासनाने आखून दिलेल्या १०० दिवसांच्या कृती आरखड्यांतर्गत संपूर्ण राज्यभर या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ० ते १८ वयोगटाच्या बालकांमधील शारीरिक, मानसिक, आणि विकासात्मक आरोग्य समस्या ओळखून त्यांच्यावर वेळेवर उपचार करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात यापूर्वी योजनेअंतर्गत बालकांच्या केलेल्या तपासणीतून संदर्भित केलेल्या १२ हजार बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. बालकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ.नागरगोजे म्हणाले, बालकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण अशी ही मोहीम आहे. आजची बालके हे उद्याच्या देशाचे भविष्य आहेत. बालके सुदृढ राहिले तरच त्यांचा विकास होणार असून पर्यायाने समाजाचा व देशाचाही विकास होणार असल्याचेही ते म्हणाले.
भास्कर पाटील म्हणाले, संतुलित आहार, नियमित व्यायाम, आणि स्वच्छता यामुळे विदयार्थी सुदृढ राहतात. त्यांचा शारीरिक विकास चांगला होतो, त्यामुळे ते अभ्यासात आणि खेळात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. आरोग्य हीच संपत्ती असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
मुख्याध्यापिका लिटील रोझ यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा समन्वयक विजय दळवी यांनी प्रास्ताविक केले.
राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत पुणे येथून करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण या ठिकाणी दाखविण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा