Health : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 'या' शहरात जनजागृती रॅली


ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात क्षयरोग मुक्त भारत अभियान राबवण्यात आले. या निमित्ताने अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने ७ डिसेंबर ते १७ मार्च या कालावधीत सुमारे दोनशेहून अधिक शिबिरे घेण्यात आली. यात शहरामध्ये २१० रुग्ण आढळले असून त्यांच्यावर मोफत उपचार सुरू करण्यात आले आहेत. क्षयरोग मुक्त अहिल्यानगर साठी लक्षणे असलेले रुग्ण वेळीच शोधून त्यांच्यावर उपचार करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी हे जनजागृती अभियान राबविण्यात आले आहे. या उपक्रमात महानगरपालिका राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

जागतिक क्षय रोग दिनानिमित्त शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. यात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह आशा सेविकांनी सहभाग घेतला. तसेच, प्रयत्न नर्सिंग होम, बूथ हॉस्पिटल, आनंदऋषीजी नर्सिंग कॉलेज असे चार नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल यात सहभागी झाले होते. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. जुनी महानगरपालिका, आशा टॉकीज, माणिक चौक, भिंगारवाला चौक, तेलिखुंट, डाळमंडई, पारशाखुंट, बूथ हॉस्पिटल पर्यंत ही रॅली काढण्यात आली. यातून क्षय रोगाच्या लक्षणांबाबत जनजागृती करण्यात आली.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून १०० दिवसाचे अभियान राबविण्यात आले. यात सुमारे २०० शिबिरे ७ डिसेंबर ते १७ मार्च या कालावधीत घेण्यात आले. त्यात २१० रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तपासण्या, उपचार पूर्णपणे मोफत आहेत. नवीपेठ येथे महानगरपालिकेचा क्षयरोग विभाग असून तेथे सर्व अत्याधुनिक तपासण्या मोफत करण्यात येत आहेत. प्रत्येक रुग्णाला सहा महिन्यात ६ हजार रुपये सहा महिन्यात शासनाकडून देण्यात येत आहेत. 

क्षय रोगाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती आवश्यक आहे. त्यातून वेळीच रुग्ण शोधून त्यांच्यावर योग्य उपचार करता येतात. या उपक्रमात आरोग्य विभागाने चांगली मेहनत घेऊन काम केले आहे. त्यामुळेच महापालिकेला राज्यात पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळाले आहे. नागरिकांनीही लक्षणे आढळल्यास तत्काळ महानगरपालिकेच्या नवीपेठ येथील क्षयरोग विभागात संपर्क साधून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

दरम्यान, क्षयरोग जनजागृतीसाठी नवीन महानगरपालिका कार्यालयात रांगोळी स्पर्धा तसेच, डॉ. विखेपाटील कॉलेज येथे पोस्टर व रिल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. क्षयरोग जनजागृतीपर या स्पर्धा मंगळवार दिनांक २५ मार्च रोजी घेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने