ब्युरो टीम : सोमवारच्या व्रताला विशेष महत्त्व हिंदू धर्मात आहे. सोमवारच्या व्रतामध्ये महादेवाची पूजा करून शिवलिंगाचा अभिषेक करावा. सोमवारी शिवलिंगाला फुलांसह अनेक वस्तू अर्पण केल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्यानं तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकते.
देवी पार्वतीनं भगवान शंकराशी लग्न व्हावे, यासाठी सोमवारचं व्रत केलं होतं. त्यामुळेच सोमवार हा महादेवाच्या पूजेसाठी समर्पित आहे. सोमवारचं व्रतं केल्यानेच भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला, अशी मान्यता आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, शास्त्रानुसार शिवलिंगाला काही वस्तू अर्पण करणे वर्ज्य आहे. चला तर, सोमवारी शिवलिंगाला काय अर्पण करू नये, ते जाणून घेऊ.
तुळस अर्पण करू नका
शिवलिंगावर तुळस अर्पण करू नये. पौराणिक कथेनुसार भगवान शिवानं तुळशीचा पती जालंधर या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण करू नयेत. तसेच शिवपूजेत तुळशीच्या पानांचा वापर करू नये.
शिवलिंगावर हळद अर्पण करू नये
हिंदू धर्मात हळद शुभ मानली जाते. हळदीचा वापर अनेक शुभ कार्यात केला जातो. मात्र शिवलिंगावर हळद अर्पण करू नये. असं मानलं जातं की, शिवलिंगावर हळद अर्पण केल्यानं पूजेचं पूर्ण फळ मिळत नाही.
नारळाचं पाणी नकोच
शिवलिंगावर सोमवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी नारळाचं पाणी अर्पण करू नये. नारळाचं पाणी अर्पण केल्यानं भगवान शिव क्रोधित होतात, अशी मान्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा