ब्युरो टीम : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज (२४ मार्च) नाशिक जिल्ह्यातील विविध आखाड्यांचे साधू-महंत, मंदिर विश्वस्त आणि प्रशासकीय अधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक नाशिक महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन येथे पार पडली. यावेळी सिंहस्थाच्या नियोजनासाठी सर्वांगीण सोयी सुविधा पुरविण्याबाबत चर्चा करण्यात आली, तसेच साधूंनी प्रशासनाकडे प्रमुख मागण्या मांडल्या.
नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी सर्व आखाड्यांचे प्रमुख, साधू-महंत आणि मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधींचे शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन स्वागत केले. या बैठकीत महंत भक्तीचरण दास महाराज,महंत सुधीरदास महाराज, फलहारी बाबा महाराज यांसह ७० पेक्षा अधिक साधू-महंत उपस्थित होते.
सिंहस्थासाठी विविध सुविधा आणि मागण्या या बैठकीत मांडण्यात आल्या. साधू-महंतांनी मागील कुंभमेळ्यातील प्रशासनाच्या सोयी-सुविधांबाबत गौरवोद्गार करून, येणाऱ्या कुंभमेळ्यात उत्तम व्यवस्थेची मागणी केली.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी साधूंच्या मागण्यांना प्राधान्य देऊन शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही या बैठकीत दिली. आयुक्त मनीषा खत्री यांनीही सर्व मुद्दे शासनापर्यंत नेण्याचे आणि सिंहस्थ यशस्वी करण्यासाठी साधू महंत तसेच उपस्थित सर्वांसमवेत काम करण्या सोबत समन्वय ठेऊन २०२७ मध्ये होणारा कुंभमेळा यशस्वी करण्याबाबत उपाययोजना करू असे सांगितले व सर्व उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांसह महानगरपालिकेचे अनेक अधिकारी उपस्थित होते.
साधू-महंतांनी बैठकीत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे :
- आखाड्यांना योग्य जागा मिळावी, सर्व आखाडे, खालसे प्रमुख आणि सार्वजनिक संस्थांना या पूर्वीचा गर्दीचा अभ्यास करून नियमानुसार जागा उपलब्ध करून देणे.
- अमृत स्नानाचे महत्त्व: "शाही स्नान" ऐवजी "अमृत स्नान" या शब्दप्रयोगाचा वापर करावा, ज्यामुळे कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व जगभर पसरेल.
- मंदिर परिसरात सुविधा: शहरातील सर्व मंदिर परिसरा जवळ कायमस्वरूपी स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन करिता डस्टबिन आणि साधूंसाठी निवासी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
- गोदावरी नदीची शुद्धता: गोदावरी नदीतील गाळ काढून पात्र स्वच्छ करणे, जेणेकरून भाविकांना शुद्ध तीर्थ मिळू शकेल अशी मागणी करण्यात आली.
- पार्किंग व्यवस्था: शहरातील सर्व मंदिर परिसर व कुंभमेळाच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी पार्किंगची योग्य व्यवस्था करणे.
- प्रयागराजच्या गर्दीचा धडा: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज कुंभमेळ्यातील गर्दीचा अनुभव घेऊन, नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये योग्य नियोजन करावे.
टिप्पणी पोस्ट करा