ब्युरो टीम : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत बुधवारी (५ मार्च) दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार आहेत. या सामन्यातील विजेता अंतिम फेरीत भारतासोबत भिडणार आहे.
न्यूझीलंड संघाने याआधी लाहोरमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. तर दक्षिण आफ्रिका आपल्या मजबूत गोलंदाजीसह विजयाची आस धरून आहे. त्यांच्या संघात कगिसो रबाडा, मार्को जानसेन आणि केशव महाराज यांसारखे प्रभावी गोलंदाज आहेत. न्यूझीलंड संघही आपला विजयी क्रम कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे. मॅट हेन्री, काईल जेमिसन आणि विल ओ’रॉर्के यांचा वेगवान मारा त्यांना मोठा फायदा करून देऊ शकतो.
दरम्यान, पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर चार विकेट्सने विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे या सामन्यातील विजेता भारताविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदासाठी लढणार आहे.
आकडेवारी काय सांगते?
वन डे क्रिकेटमध्ये न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आतापर्यंत ७३ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी दक्षिण आफ्रिकाने ४२ सामने जिंकले, तर न्यूझीलंडने २६ विजय मिळवले आहेत. ५ सामने अनिर्णीत राहिले आहेत. तर, चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत २ वेळा आमनेसामने आले असून प्रत्येकी १ विजय मिळवला आहे. या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे हा उपांत्य सामना अत्यंत अटीतटीचा होईल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
टिप्पणी पोस्ट करा