ब्युरो टीम : सौर ऊर्जेचा वापर करून कमी खर्चात विजेची निर्मिती, घनकचरा व्यवस्थापन, पवनचक्की यावर आधारित शाळकरी विद्यार्थ्यांनी बनवलेले वैज्ञानिक प्रकल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर येथे पाहण्याची संधी शाळकरी विद्यार्थ्यांना मिळाली. निमित्त होते ‘स्टेम मेला’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या सोनिया गरचा, प्रशिक्षणार्थी अधिकारी सुजाता जाधव, गिर्यारोहक शर्विका म्हात्रे आणि भोसरी विभागाच्या पर्यवेक्षिका सुनीता गिते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन फुलसुंदर होत्या.
प्रदर्शनात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे एकूण ९५ प्रकल्प होते. या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जा, घनकचरा व्यवस्थापन, पवनचक्की, भूकंप, हवेचे वजन यासारख्या विषयांवर अत्यंत कल्पकतेने प्रकल्प तयार केले होते. या विद्यार्थ्यांना रूपाली घोडेकर यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी स्टेम संस्थेच्या स्वाती पठारे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना पाचारणे यांनी केले. पालकांनी या प्रदर्शनाला भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांची कल्पकता दिसून आली. हा शिक्षण क्षेत्रासाठी सकारात्मक संकेत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासात वाढ होते. शालेय शिक्षण हे केवळ पुस्तकी न राहता प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवण्यासाठी असे उपक्रम आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग सातत्याने राबवत असते.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेला चालना देण्यासाठी अशा प्रदर्शनांचे सातत्याने शिक्षण विभाग आयोजन करीत असते. विद्यार्थीदशेत विज्ञानाशी मैत्री व्हावी, यासाठी असे उपक्रम खूपच उपयुक्त ठरत असतात.
- विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
टिप्पणी पोस्ट करा